तीन मंत्री आणि चौदा आमदारांनी राजीनामे देताच मोदी अॅक्शन मोडवर..

भाजपच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) आजच्या बैठकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सहभागी झाले होते.
Narendra Modi & Yogi Adityanath
Narendra Modi & Yogi AdityanathSarkarnama

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) आजच्या (ता.13 जानेवारी) बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election-2022) तिकीट वाटपाबाबत प्रदीर्घ मंथन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे स्वतः या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपला (BJP) लागलेली गळती वाढत चाललेली पाहून तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांनी आपल्या हाती घेतली याचेच हे द्योतक आहे. उत्तर प्रदेशातून योगी आदित्यनाथ याची पाठ फिरताच स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Morya) यांच्यापासून भाजपच्या आमदारांनी धडाधड पक्षत्याग सुरू केला आहे. आतापर्यंत ३ मंत्री व १४ आमदारांनी भाजपला टाटा केला असून ही यादी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Narendra Modi & Yogi Adityanath
UP Election : ATS हिंदू विरोधी आहे का?; काँग्रेस नेत्याने केला सवाल

उत्तर प्रदेशातील ही 'पानगळ' पाहून खुद्द भाजप नेतृत्वही काहीसे आचंबित झाल्याचे पहायला मिळते. अडचणीच्या वेळी असणारी नेहमीची मौनाची भूमिका भाजपच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी सध्या घेतली तरी पडद्याआड वेगवान घडामोडी सुरू आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गेले दोन दिवस रात्रीचा दिवस करून उत्तर प्रदेशात असे का घडत आहे याची खडानखडा माहिती घेतल्याचे समजते. इतका मोठा झटका बसण्याची कुणकूणही योगी आदित्यनाथ यांना लागली कशी नाही, या विचाराने सर्वोसर्वा भाजप नेतृत्व काहीसे साशंक आहे.

सीईसीच्या बैठकीत शहा, प्रभारी धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, दिनेश शर्मा व केशव प्रसाद मौर्य हे दोन्ही उपमुख्यमंत्री आदी नेतेही बैठकीत सहभागी झाले आहेत. भाजपाध्यक्ष जे.पी नड्डांसह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी हे कोरोनाग्रस्त मंत्रीही डिजिटल माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. सध्याच्या वातावरणात भाजपने ४०३ पैकी प्रत्येक जागेवरील उमेदवार अत्यंत बारकाईने निवडण्याची भूमिका घेतली आहे. अंतिमतः मुद्दा २०२४ मध्ये देशाची सत्ता राखण्याचा असल्याने यापुढे योगी आदित्यनाथ यांचा शब्द दिल्लीत आता अंतिम मानला जाणार नाही. हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यूपी प्लस योगी-बहोत है उपयोगी या पंतप्रधानांच्या घोषणेतील फोलपणा १४ आमदार व ३ मंत्र्यांनीच दाखवून दिला, असे पक्षनेतृत्वाच्या लक्षात आले आहे.

Narendra Modi & Yogi Adityanath
अखिलेश यांच्यानंतर जयंत चौधरींची फोडाफोडीत आघाडी..भाजपसह काँग्रेसला दे धक्का!

दुसरीकडे ही गळती पाहून सहकारी पक्षांनीही दबाव वाढवायला सुरवात केली आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या 'अपना दल'ने भाजपकडे २० जागा मागितल्या असून निषाद पक्षाचे संजय निषाद यांनीही वाढीव जागांसाठी आग्रह धरला आहे. या स्थितीत भाजपला ३८० ते ३८५ जागाच एकट्याने लढविता येतील अशी स्थिती आहे. या जागांसाठी कमीत कमी ४००० पेक्षा जास्त इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्वापुढील पेच वाढला आहे. योगी यांनी अयोध्येतून निवडणूक लढविण्यावरही आज (ता.13 जानेवारी) चर्चा झाल्याचे समजते. तरी याचाही आता अंतिम निर्णय पक्षनेतृत्वच घेणार आहे. गेले दोन दिवस शहा यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये जी चर्चा झाली त्याचाच पुढचा अध्याय आजच्या बैठकीत चर्चिला गेला. सहकारी पक्षांनी साथ सोडू नये यासाठी किती लवचिकपणा दाखवावा यावरही आज चर्चा झाली. संक्रांतीनंतर पक्षाच्या उत्तर प्रदेशातील उमेदावारांची पहिली 'मोठी' यादी येण्याची शक्यता आहे.

भाजपची धाकधूक वाढली..

उत्तर प्रदेशासह इतरत्र मुस्लिम मतदाराला भाजप गृहीत धरतच नाही व मागास जातींमध्ये ही धगधग समोर आली असेल तर, भाजपसाठी ते फारच मोठे नुकसान ठरेल, असे राजकीय जाणकार सईद अंसारी यांचे मत आहे. अंसारी यांच्या म्हणण्यानुसार मौर्य यांच्यासह भाजप सोडून जाणाऱयांत मागासवर्गीय आमदारांची बहुसंख्या आहे. राजकारण, मुलाबाळांनाही भाजपची तिकीटे मिळणे व राजकीय स्वार्थाच्या पलीकडेही याचा एक अर्थ लावला जाऊ शकतो. तो म्हणजे सत्तेच्या आशेने भाजपकडे आलेल्या या आमदारांना भाजपची 'मूळ' विचारसरणी हा पक्ष कधीही सोडत नसल्याचे लक्षात आले व निराशाग्रस्त होऊन त्यांनी पक्ष सोडला असावा अशीही दाट शक्यता दिसते. स्वामीप्रसाद यांच्यासह यातील बहुसंख्य मंत्री- आमदार कुशवाहा, मौर्य, शाक्य व सैनी यासारख्या अनेक मागास व अती पिछडा वर्गाच्या जातीतून येतात. पूर्वांचल, अवध भागासह राज्याच्या अनेक प्रदेशांत या जातींचे प्राबल्य आहे. त्यामुळेच भाजपची धाकधूक सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com