UP Election 2022 : मुलायमसिंहांच्या घरात फूट; सूनबाईंचा भाजप प्रवेश?

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)) सरकारमधील तीन मंत्री समाजवादी पक्षात गेल्यानंतर भाजपला धक्का बसला होता.
Aparna Yadav
Aparna YadavSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकारणाने (UP Election 2022) वेग पकडला असून आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे गोरखपूरमधूनच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच दणका देण्याची योजना भाजपने आखली आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांच्या सूनबाई अपर्णा यादव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही टिव्ही चॅनेल्सने दिलेले आहे. अधिकृत पातळवीर याची माहिती भाजपने जाहीर केलेली नाही. मात्र तसे घडले तर अखिलेश यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

Aparna Yadav
निवडणूक संपली की योगी आदित्यनाथ पाहणार कंगनाची भूमिका असलेला हा चित्रपट

मुलायम यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर परत मुलायम आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी आपण कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते. समाजवादाचे दुसरे नाव हे अखिलेश असल्याचे जाहीरपणे सांगत त्यांनी पक्षासोबत राहणार असल्याचा संदेश दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती.

तेथील वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एक माजी केंद्रीय मंत्री, तीन आमदार आणि अपर्णा यादव हे सारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. भाजप खरोखरीच यादव कुटुंबात फूट पाडण्यात यशस्वी होईल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Aparna Yadav
अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

इतर घडामोडी

-योगी गोरखपूरच्या गडातूनच लढणार
-उपमुख्यमंत्री मौर्य सिराधूतून मैदानात
-विद्यमान २१ आमदारांची तिकिटे कापली
-भाजपकडून यूपीसाठी १०७ उमेदवार जाहीर

योगी आदित्यनाथ अयोध्या किंवा मथुरेतून निवडणूक लढविणार अशी जोरदार चर्चा होती. गेल्या पाच वर्षांमध्ये ते किमान ४२ वेळा अयोध्येला गेले होते. स्वतः त्यांनीही येथूनच निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली होती.मात्र गेल्या आठवड्यात भाजपमधून बाहेर पडणारे मंत्री व आमदारांची अक्षरशः रांग लागल्याच्या पार्श्वभूमीवर योगी यांना राज्यभर प्रचारासाठी वेळ मिळावा यादृष्टीने पक्ष नेतृत्वाने त्यांचा गड असलेल्या गोरखपूरमधूनच त्यांना किल्ला लढविण्यास सांगितले आहे.

Aparna Yadav
आता तिथेच राहा, परत येऊ नका! अखिलेश यादवांचा योगींना टोला

यांनाही मिळाली संधी
भाजपच्या अन्य प्रमुख उमेदवारांत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (सिराधू), श्रीकांत शर्मा (मथुरा), संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र पंकज सिंह (नोएडा), दिवंगत नेते कल्याणसिंह यांचे नातू संदीप सिंह यांच्यासह हिंदूंच्या पलायनामुळे चर्चेत आलेल्या कैरानातून मृगांका सिंह आदी ठळक चेहऱ्यांचा समावेश आहे. आग्रा लोकसभा मतदारसंघातील ९ पैकी ८ उमेदवार भाजपने बदलले आहेत. या यादीत ओबीसी (४४ जागा), अनुसूचित जाती (१९), महिला (१०) यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५७ व दुसऱ्या टप्प्यातील ५५ पैकी ४८ जागांचे उमेदवार भाजपने आज जाहीर केले.

असाही विक्रम
उत्तर प्रदेशात २००३ नंतर विधानसभा निवडणूक लढविणारे योगी हे मुलायमसिंह यादव यांच्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. मुलायमसिंह यांनी १९ वर्षांपूर्वी गुन्नौरमधून विक्रमी विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर २००७ (मायावती), २०१२ (अखिलेश यादव) व २०१७ (योगी आदित्यनाथ) हे तीनही विधान परिषदेचे सदस्य होते.

Aparna Yadav
UP Election 2022 : मौर्य यांचा भाजपला हिसका; सातवा धक्का देत पाडले भगदाड

अग्रवाल यांना डच्चू
गोरक्षपीठाचे प्रमुखपद सांभाळणारे योगी यापूर्वी येथूनच तब्बल पाच वेळा हिंदू महासभा व नंतर भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. २००२ पासून सलग ४ वेळा गोरखपूरचे आमदार असलेले योगी यांचे निष्ठावंत डॉ. राधामोहन अग्रवाल यांना योगींसाठी आपल्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे.

योगींनी गोरखपूरमध्येच थांबावे : भाजपच्या पहिल्या यादीवर अखिलेश यादव यांची टीका

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज जोरदार टीका केली आहे. भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिल्याबाबत बोलताना अखिलेश म्हणाले की, ‘‘ आता ते गोरखपूरमधून निवडणूक लढवीत असून त्यांनी तिथेच थांबायला हरकत नाही.’’ गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथून सलग पाचवेळेस ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गोरखनाथ मठाचे ते प्रमुख देखील आहेत. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना यादव म्हणाले की, ‘‘ यंदा समाजवादी पक्ष गोरखपूरची देखील जागा जिंकून दाखवेल, आदित्यनाथ यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये सांडपाण्याचे पाइप देखील टाकता आले नाहीत. ते स्वतः मेट्रो सिटी सांभाळू शकत नाहीत त्यामुळेच गोरखपूरमधील जनता यावेळी त्यांना चांगलाच धडा शिकवेल.’’ मध्यंतरी योगी आदित्यनाथ यांनी एका दलिताच्या घरी जात खिचडी खाल्ली होती, त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, ‘‘जेवताना योगींच्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही पाहिले नाहीत का, आता त्यांच्याकडे फक्त खिचडी खाण्यासाठी वेळ आहे.’’

Aparna Yadav
बार्शीच्या `हर्षद मेहता` च्या करामती : `दहा लाख गुंतवा; वर्षात सहा कोटी हसत न्या!`

समाजवादी पक्षासोबत आघाडी नाहीच : चंद्रशेखर आझाद

लखनौ : आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर घणाघाती टीका केली. अखिलेश यांनी माझा अवमान केला असल्याचे सांगत त्यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपला पक्ष समाजवादी पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे नमूद केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आझाद म्हणाले की, या संभाव्य आघाडीबाबत साधारपणे महिनाभरापेक्षाही अधिक काळापासून चर्चा सुरू होती. सध्या विभक्त झालेल्या विरोधकांना एकत्र यायचे नसेल तर आपण स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवू. तब्बल एक महिना दहा दिवस अखिलेश यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे जाणवले की, त्यांना दलितांची गरज नाही. दलित नेतृत्वासाठी जागा करून देण्याची इच्छा दिसत नाही, त्यांना फक्त दलितांची मते हवी आहेत. नेताजींना नेता बनविणाऱ्या कांशीराम यांची तत्त्वे मी पाळतो. दलित राजकारणाला केंद्रस्थानी आणण्याचा आमचा विचार आहे. मागील दोन दिवसांपासून मात्र बहुजन समाजाचा अवमान केला जातो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com