अटकेच्या भीतीने केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं पोलिसांना दिली हुलकावणी!

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेच्या भीतीने केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं पोलिसांना दिली हुलकावणी!
Ashish Mishra

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. पण त्याने अटकेच्या भीतीने पोलिसांना हुलकावणी दिल्याचे समजते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी आठ जणांची टीम तयार केली आहे. वरिष्ठ अधिकारी उपेंद्र अगरवाल हे टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीमकडून आशिष याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्य गुरूवारी बजावण्यात आलं होतं.

Ashish Mishra
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!

आशिष हा पोलिसांसमोर हजर होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होत्या. पण आशिषने अटकेच्या भीतीने चौकशीला येणं टाळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पोलीस कोणती पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे. आशिषच्या अटकेसाठी विरोधकांकडून दबाव वाढवला जात आहे. यावर बोलताना उत्तर प्रदेशाच्या पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंग यांनी आशिषचा शोध सुरू असल्याचे गुरूवारी सांगितले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, आशिष मिश्रा याला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Ashish Mishra
राहुल गांधींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार! पण...

दरम्यान, दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रावरून न्यायालयात गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. या पत्राच्या आधारे न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. यावर न्यायालयानं उत्तर प्रदेश पोलिसांकडे कारवाई माहिती मागवली आहे. घटनेप्रकरणी कुणावर गुन्हे दाखल केले, कुणाला अटक केली आदी माहिती मागवण्यात आली आहे. तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची स्वतंत्र चौकशी केली जात असल्याची माहिती सरकारकडून न्यायालयात देण्यात आली. शुक्रवारी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या घटनेच्या चौकशीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी अजय मिश्रा यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. ते पदावर असताना योग्यप्रकारे चौकशी होऊ शकणार नाही, असा आरोप केला जात आहे. भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही ट्वीट अजय मिश्रा यांना अडचणीत आणले आहे. आपल्या ट्वीटर वरुण गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.