आठवले म्हणतात, सुशांतची आत्महत्या नव्हे खूनच..! - union minister of state ramdas athavale said sushant singh rajput was murdered | Politics Marathi News - Sarkarnama

आठवले म्हणतात, सुशांतची आत्महत्या नव्हे खूनच..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक दावे केले जात आहेत. यात आता रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. आता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी या प्रकरणी धक्कादायक दावा केला आहे. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. नीरज  याची सीबीआयने 25 ऑगस्टला सलग पाचव्या दिवशी चौकशी केली होती. सिद्धार्थ याचीही 25 ऑगस्टला सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही काल चौकशी करण्यात आली. काही वेळ चौकशी झाल्यानंतर ते तेथून बाहेर पडले. याचबरोबर मुंबई पोलिसांचे पथकही काल सकाळी गेस्ट हाऊसवर येऊन सीबीआय पथकाला भेटले. काही वेळ चर्चा केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथून बाहेर पडले होते. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची आज सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. 

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सुशांतचे वडील के.के.सिंह आणि त्याची बहीण राणीसिंह यांची भेट घेतली. ही भेट हरियानातील फरिदाबाद येथील राणीसिंह यांच्या घरी झाली. या वेळी आठवले यांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे, असे मला वाटते. सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा. सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असून, त्याचे कुटुंबीय याबद्दल समाधानी आहेत. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख