बिहारमध्ये विकासापेक्षा गाजतोय विरोधकांच्या देशभक्तीचा मुद्दा! - union minister of state nityanand rai targets rahul gandhi and tejashwi yadav | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये विकासापेक्षा गाजतोय विरोधकांच्या देशभक्तीचा मुद्दा!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपकडून देशभक्तीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना लक्ष्य केले जात असून, यावरुन वातावरण तापले आहे.  

पाटणा : विरोधी पक्षांना 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' या घोषणा देण्यातही अडचण वाटते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना केला होता. आता भाजपच्या इतर नेत्यांनीही देशभक्तीचा हाच मुद्दा उचलून धरत विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले आहे. 

देशभक्तीच्या मुद्द्यावर काल पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले होते. येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले होते की, बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्या पक्षाचे सहकारी पक्ष 'भारत माता की जय' घोषणा देत नाहीत. याचा विचार तुम्ही करा. मात्र, जंगलराजच्या सहकाऱ्यांना ही घोषणा दिली जाऊ नये असे वाटते. याचबरोबर तुम्ही 'जय श्री राम' असेही म्हणू नये, अशीही त्यांची इच्छा आहे. जंगलराजच्या सहकाऱ्यांना भारत मातेबाबतही अडचण आहे. एक गट म्हणतो की तुम्ही 'भारत माता की जय' घोषणा देऊ नका आणि दुसऱ्याला या घोषणेमुळे डोकेदुखी होते. आता भारत मातेच्या विरोधातील हे लोक मते मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत. त्यांना तुम्ही योग्य उत्तर द्या.  

बिहारच्या प्रचारात आता भाजपकडून बिहारच्या विकासाऐवजी विरोधकांच्या देशभक्तीचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे. नित्यानंद राय यांनीही आज हाच मुद्दा उपस्थित करीत विरोधकांवर हल्ला चढवला. अररियामधील नरपतगंज येथील एका सभेत बोलताना राय म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपवर आरोप करीत आहेत की आम्ही भारत माता की जय जनतेवर लादत आहोत. भारतीयाने 'भारत माता की जय' म्हणायचे नाही तर काय 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणायचे का, हे आता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सांगावे.     

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा काल (ता.3) झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख