बिहारच्या निवडणुकीत अनुराग ठाकूरांचा 'शोले'...सो जा बेटे नही तो गब्बरसिंग आ जाएगा..! - Union Minister of State Anurag Thakur reminds Bihari voters of Gabbar Singh | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या निवडणुकीत अनुराग ठाकूरांचा 'शोले'...सो जा बेटे नही तो गब्बरसिंग आ जाएगा..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू आहेत. 

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज शोले चित्रपटातील गब्बरसिंगचा दाखला देत विरोधकांना लक्ष्य केले. त्यांनी 'सो जा बेटे नही तो गब्बरसिंग आ जाएगा' हा डायलॉग मारुन जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सत्तेत आल्यास बिहारमध्ये जंगलराज येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

येथील प्रचारसभेत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, बिहारमधील जंगलराज पाहिलेल्या मातांनी त्यांचा मुलांना 'सो जा बेटे नही तो गब्बरसिंग आ जाएगा' हा इशारा देण्याची आवश्यकता आहे. विशेषत: युवकांना मतदान करताना सावधगिरीचा इशारा देण्याची गरज आहे. आरजेडी सत्तेत आल्यास पुन्हा बिहारमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण होईल. राज्य पुन्हा एकदा जातीय तणाव आणि सामाजिक भेदभावाच्या गर्तेत जाईल. 

आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडी ही नैराश्यग्रस्त आणि गोंधळलेली आहे, असा टोला लगावून ठाकूर म्हणाले की, आरजेडी सत्तेत असताना बिहारमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. आरजेडी आणि तेजस्वी यादव यांनी डावे पक्ष, तुकडे-तुकडे गँगशी आघाडी का केली याचे उत्तर आधी द्यायला हवे. त्यांना पुन्हा बिहारमध्ये जंगलराज आणायचे आहे का अथवा पुन्हा एकदा राज्यात रक्तपात करावयाचा आहे का? 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख