बिहारच्या रणधुमाळीत भाजपला दुसरा धक्का...आणखी एका स्टार प्रचारकाला कोरोना - union minister smriti irani tested covid19 positive | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या रणधुमाळीत भाजपला दुसरा धक्का...आणखी एका स्टार प्रचारकाला कोरोना

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याविषयी माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, स्मृती इराणी या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. याआधी स्टार प्रचारकांमधील सुशीलकुमार मोदी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

स्मृती इराणी यांनी ट्विटवर म्हटले आहे की, एखादी घोषणा करताना त्याच्याशी निगडित शब्द शोधणं माझ्यासाठी अवघड बनणे हे अगदी अपवादात्मक परिस्थिती घडते. त्यामुळे मी सोप्या शब्दात सांगते. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करावी.

स्मृती इराणी या मागील काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 30 स्टार प्रचारकांमध्ये स्मृती इराणी यांचा समावेश आहे. स्मृती इराणी यांनी नुकतीच गोपालगंज येथे एक जाहीर सभा घेतली होती. स्मृती इराणी या जाहीर सभांतून विरोधकांवर हल्लाबोल करीत आहेत. 

स्मृती इराणी यांनी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आता प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाला हा दुसरा धक्का बसला आहे. याआधी भाजप नेते व बिहारचे मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे त्यांनाही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारापासून दूर राहावे लागले होते. आता स्टार प्रचारक असलेल्या स्मृती इराणीही प्रचारापासून दूर असतील. 

स्मृती इराणी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपाद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत आणि रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आला होते. मात्र, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख