चंद्रशेखर राव अन् ओवेसींच्या भ्रष्ट युतीमुळे हैदराबादची वाट लागली; स्मृती इराणींचा हल्लाबोल

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजप नेत्या स्मृती इराणींना आज प्रचारात उडी घेतली आहे.
union minister smriti irani targets trs and aimim in ghmc election campaign
union minister smriti irani targets trs and aimim in ghmc election campaign

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणींना आज प्रचारसभेत तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्ताधारी टीआरएसला शहरात नुकत्याच आलेल्या महापुरासाठी जबाबदारी धरत 75 हजार अतिक्रमणे झालीच कशी, असा सवालही इराणींनी केला. 

हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून,  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी टीआरएसच्या सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.  

टीआरएस आणि एआयएमआयएमच्या भ्रष्ट युतीमुळे शहरात 75 हजार अतिक्रमणे होणे शक्य नाही, असे सांगून इराणी म्हणाल्या की, वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आता स्वप्नभंग झाला आहे. शहर संपूर्ण पुरात बुडाले आणि अनेक नागरिकांचा बळी गेला. याला टीआरएस आणि एआयएमआयएमची भ्रष्ट युती कारणीभूत आहे. 

हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करुन रोहिंग्या आणि पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान भाजपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी केले होते. यावर ओवेसींना आधी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा, असे प्रत्युत्तर दिले होते. याचा धागा पकडत इराणी म्हणाल्या की, भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्हाला अशी कारवाई नको आहे.  

हैदराबाद महापालिकेत सत्ता आल्यास दर महिन्याला नागरिकांना वीस हजार लिटर मोफत पाणी देण्याचे आश्‍वासन राज्यातील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) दिले आहे. टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना दरमहा 20 हजार लिटर पाणी देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने यावर कडी करीत नागरिकांना ३० हजार लिटर मोफत पाणी देणार असल्याचे जाहीर केले होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना मोफत पाण्याचे आश्‍वासन देण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे. इतरही आश्वासनांची खैरात सध्या पक्षांकडून होत आहे. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com