पोस्टरवर आई-बापाचा फोटो लावायला लाज वाटते का? - union minister ravi shankar prasad targets rjd leader tejashwi yadav | Politics Marathi News - Sarkarnama

पोस्टरवर आई-बापाचा फोटो लावायला लाज वाटते का?

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि जेडीयूसमोर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आव्हान उभे केले आहे. 
 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) तेजस्वी यादव हे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची छायाचित्रे पोस्टरवरुन गायब झाल्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज तेजस्वींना लक्ष्य केले. 

रविशंकर प्रसाद यांनी आज औरंगाबादमधील प्रचारसभेत बोलताना जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे आणि राम मंदिराचे निर्माण हे दोन मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासही काही जणांचा विरोध आहे. याचबरोबर त्यांचा कलम 370 रद्द करण्यासही विरोध आहे. मी त्यांना स्पष्ट इशारा देतो की 'दो निशाण, दो प्रधान' असे देशात चालू देणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणी तिरंगाच असेल. 

आरजेडीच्या पोस्टरवरुन लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी हे गायब झालेले दिसत आहेत. यावरुन प्रसाद यांनी थेट तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्या विरोधी पक्षनेते प्रचार करताना दिसत आहेत. परंतु, त्यांच्या आई-वडिलांची छायाचित्रे प्रचारातून गायब आहेत. लालू आणि राबडी यांनी साडेसात वर्षे बिहारवर राज्य केले. त्यांची छायाचित्रे न वापरण्यामागील कारण काय आहे? त्या दोघांची छायाचित्रे वापरल्यास बिहारमधील अपहरण, लूट, खंडणीची प्रकरणे पुन्हा जनतेच्या डोळ्यासमोर येतील, अशी भीती तेजस्वींना वाटत आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख