राहुल गांधींना कायम पाकिस्तान अन् चीनचेच कौतुक; जावडेकरांचा हल्लाबोल - union minister prakash javdekar slams congress leader rahul gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींना कायम पाकिस्तान अन् चीनचेच कौतुक; जावडेकरांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा जोर चढत असतानाच नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. 

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आज हल्लाबोल केला. जावडेकर यांनी राहुल गांधींना पाकिस्तान आणि चीनचे समर्थक ठरवले आहे. भाजप नेत्यांनी आता वादग्रस्त वक्तव्ये करुन वातावरण तापवण्यास सुरूवात केली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी आज राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी हे कायम त्यांच्या भाषणात पाकिस्तानचे कौतुक करीत असतात. कोणताही विषय असो ते पाकिस्तान अन् चीनची प्रशंसा करताना दिसतात. हा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. 

काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना जावडेकर म्हणाले की, कलम 370 रद्द करण्याचे देशातील जनतेने स्वागत केले आहे याची माहिती काँग्रेसला आहे. काँग्रेस त्यांच्या बिहारच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख करु शकते का? 

भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आज आरजेडी सत्तेवर आल्यास बिहार नक्षलवाद्यांचा अड्डा बनेल, असे वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे कमकुवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास राज्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव पुन्हा वाढेल. 

याआधी नित्यानंद राय यांचा वादग्रस्त व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वैशाली जिल्ह्यातील महनार येथील प्रचारसभेतील भाषणाचा हा व्हिडीओ होता. या सभेत बोलताना नित्यानंद राय म्हणाले होते की, बिहारमध्ये आरजेडीने सरकार बनवले तर बिहार दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. काश्मीरमधून आम्ही ज्या दहशतवाद्यांना हाकलून लावत आहोत तेच बिहारमध्ये आश्रय घेतील. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख