रेल्वे मंत्रालय काढून घेतल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यावर मोठी जबाबदारी - union minister piyush goyal appointed as rajya sabha house leader | Politics Marathi News - Sarkarnama

रेल्वे मंत्रालय काढून घेतल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यावर मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गोयल त्यांचे रेल्वे खाते काढून घेतल्याने ते नाराज असल्याने त्यांची निवड झाल्याची चर्चा आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे राज्यसभेच्या (Rajya Sabha) सभागृह नेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी १९ जुलैपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गोयल त्यांचे रेल्वे खाते काढून घेतल्याने ते नाराज असल्याने त्यांची निवड झाल्याची चर्चा आहे. 

गोयल हे कुशल प्रशासक आहेत. तोंडी तलाक आणि कलम 370 च्या विधेयकांवेळी त्यांनी अतिशय कुशलपणे सरकारची बाजू सांभाळली होती. भाजपमधील नेतेच नव्हे तर विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. गोयल यांच्याकडे आधी रेल्वे मंत्रालयही होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात हे खाते अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आले. आता गोयल त्यांच्याकडे वाणिज्य, उद्योग, ग्राहक कामकाज आणि अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग आदी मंत्रालयाचा कार्यभार आहे. गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले आहेत. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवानी, माजी संरक्षणमंत्री व अर्थमंत्री अरुण जेटली आदी बड्या नेत्यांनी भूषवलेले वरिष्ठ सभागृहाचे नेतेपद गोयल यांच्याकडे आले आहे. माजी समाज कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. महत्त्वाच्या विधेयकांवेळी गोंधळ शांत करण्यासाठी सतत पुढे असणाऱ्या नेत्यांमध्ये गोयल यांचा सहभाग होता. यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोयल त्यांचे रेल्वे खाते काढून घेतले होते. तेव्हापासून ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना हे पद देऊन पक्ष नेतृत्वाने चुचकारल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच भाजप नेता करु लागला विरोधी पक्षाला फॉलो 

राज्यसभेत भाजपचे अद्यापही स्पष्ट बहुमत नाही. पुढील वर्षापर्यंत तसे होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे राज्यसभेत महत्त्वाची विधेयके मंजूर करताना विरोधी पक्षांना विश्वासात घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे याला महत्त्व आहे. जिभेवर साखर असणारे नेते म्हणून गोयल राज्यसभेत ओळखले जातात. डावे पक्षनेते वगळता सर्वांशीच गोयल यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख