राणेंनी दिल्लीत बसवलं बस्तान...आठवडाभरात नड्डा, शहा, गडकरींसह अनेक नेत्यांच्या गाठीभेटी - union minister narayan rane meets bjp leaders in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

राणेंनी दिल्लीत बसवलं बस्तान...आठवडाभरात नड्डा, शहा, गडकरींसह अनेक नेत्यांच्या गाठीभेटी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan Rane) यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून दिल्लीला आलेले राणे आता येथे चांगले रुळल्याचे दिसत आहे. आठवडाभरात राणेंनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह पक्षासह सरकारमधील अनेक बड्या नेत्यांत उठबस सुरू केली आहे. 

राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार 8 जुलैला स्वीकारला. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 10 जुलैला त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. नंतर 13 जुलैला त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला त्यांनी जुने सहकारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काल (ता.15) राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सदिच्छा भेट घेतली. राणेंनी पक्ष आणि सरकारमधील वरिष्ठांच्या  भेटींचा धडाका लावल्याचे दिसत आहे. 

याचवेळी राणेंनी मंत्रालयातील कामाचीही जोरदार सुरवात केली आहे. ते मंत्रालयाच्या विविध विभागांच्या बैठका बोलावत आहेत. याचबरोबर मंत्रालयाच्या अनेक उपक्रमांना ते उत्साहाने हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची
ट्विटही आता इंग्रजीतून होऊ लागली आहेत. पूर्वी राणेंची बहुतांश ट्विट ही मराठीतून असत. आता ती प्रामुख्याने इंग्रजीत होऊ लागली आहेत. 

राणेंनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार त्यांनी मानले होते.  या ट्विट केलेल्या आभाराच्या पत्रात म्हटले होते की, आभार, आभार, आभार. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेत, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली. 

केंद्रीय मंत्री पदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच, भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी मला फोन करुन व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या. काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. 

हेही वाचा : कॅप्टनच्या विरोधामुळे सिद्धूंना सलामीला उतरण्याआधीच पक्षानं बोलावलं परत! 

तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळे मी येथवर पोहोचू शकलो, असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा! आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एका वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो, भविष्यात प्रत्यक्ष भेटू व बोलू, असे राणेंनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख