काँग्रेस अन् महाआघाडीचा पाठिंबा जिनांना का? गिरीराजसिंह यांचा सवाल - union minister giriraj singh criticizes congress and mahagathbandhan | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस अन् महाआघाडीचा पाठिंबा जिनांना का? गिरीराजसिंह यांचा सवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डॉ.मकसूर अहमद उस्मानी हे उतरले आहेत. यावरुन मोठा वादंग बिहारच्या राजकारणात सुरू झाला आहे. भाजपने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. 

पाटणा : बिहारमध्ये जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने मोठा वादंग सुरू झाला आहे. या मुद्द्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह यांनी या मुद्द्यावर काँग्रेस आणि महाआघाडीला लक्ष्य केले. काँग्रेसच्या स्टार प्रचारक दिल्ली दंगलीतील आरोपी शेरजिल इमाम असणार का, असा सवालही त्यांनी केला आहे. 

याविषयी बोलताना गिरीराजसिंह म्हणाले की, जाले मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हा जिना समर्थक आहे. याबद्दल काँग्रेस आणि महाआघाडीने उत्तर द्यायला हवे. ते बिहारच्या भल्यासाठी काम करीत असल्याचा दावा करतात. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस हे जिनांच्या विचारसरणीवर निवडणूक लढत आहेत का? आता त्यांच्या स्टार प्रचारक शेरजिल इमाम असणार का? 

वाचा : चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले डॉ. उस्मानी आहेत तरी कोण? 

नित्यानंद राय यांचे विधान बातम्यांममध्ये आले होते. परंतु, जिना समर्थक उमेदवाराल तिकिट मिळाल्याने त्यांचे विधान योग्य होते, हे स्पष्ट होत आहे. लालूंच्या कार्यकाळात बिहारमध्ये सिमीचे मुख्यालय होते. सिमी ही काय देशभक्त संघटना आहे का? सत्य हे सांगायलाच हवे. केवळ मतासाठी देश आणि बिहारचे नुकसान होऊ नये. ते मतांसाठी काहीही करु शकतात. 

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या उस्मानी यांच्या उमेदवारीने बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. उस्मानी हे दरभंगा जिल्ह्यातील आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिक नोंदणी सूची यांच्याविरोधातील आंदोलनात ते अग्रभागी होते. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टु़डंट्स युनियनच्या अध्यक्षपदी त्यांची डिसेंबर 2017 मध्ये निवड झाली होती. त्यांनी अजयसिंह यांचा 6 हजार 719 मतांनी पराभव केला होता. 

वाचा : मला तिकिट नको पण त्याला तरी कशाला देता...

उस्मानी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा 2019 मध्ये दाखल झाला होता. त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर सफूरा झरगर आणि मीरन हैदर यांच्या अटकेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा ठपका ठेवत ट्विटरवने त्यांचे अकाउंट चालू वर्षात तात्पुरते  बंद केले होते. उस्मानी यांच्या उमेदवारीनंतर राज्यात मोठा गदारोळ उडाला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर स्वपक्षातील नेतेही उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख