अमित शहांचा बंगाल दौरा वादात...बिरसा मुंडांच्या अपमानाचा मुद्दा पेटला - union home minister amit shah west bengal visit created new controversy | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांचा बंगाल दौरा वादात...बिरसा मुंडांच्या अपमानाचा मुद्दा पेटला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, हा दौरा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 

कोलकता : भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेचा निर्धार केला आहे. राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत असून, आतापासूनच भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहेत. ते बंगालच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.शहा यांनी बिरसा मुंडा यांचा अपमान केल्याच्या मुद्दा आता विरोधकांनी उचलून धरला आहे. 

अमित शहा यांच्या या दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी आतापासूनच बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. शहा यांनी आदिवासीबहुल बांकुरा जिल्ह्यातून थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना वंदन करून त्यांनी प्रचारास सुरवात केली. तेथे बिरसा मुंडा यांची प्रतिमा एका शिकाऱ्याच्या पुतळ्याच्या पायाजवळ ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

अमित शहा यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्याआधी स्थानिक शिकाऱ्याच्या पुतळ्याच्या पायाशी बिरसा मुंडा यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. स्थानिक शिकाऱ्याच्या पुतळ्याला आधी पुष्पहार घालण्यात आला होता. स्थानिक नेत्यांनी सांगितल्यानंतर शहा यांनी नंतर बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून वंदन केले. 

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन शहा आणि भाजपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांना आता आयताच मुद्दा मिळाला आहे. शहांच्या सभेतील व्यासपीठावर बिरसा मुंडा यांचा पुतळाच नव्हता. त्याजागी स्थानिक आदिवासी शिकाऱ्याचा पुतळा ठेवण्यात आला होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. 

विरोधी पक्षांसह काही संघटनांनी भाजपवर या प्रकरणी टीका केली आहे. भारत जकात माझी परगणा महाल या संघटनेचे नेते हेम्बराम म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना येथील स्थानिक लोकांच्या परंपरांचे देखील ज्ञान नाही. हा स्थानिक आदिवासींचा अवमान आहे. भाजपचे खासदार सुभाष सरकार यांनी या चुकीबद्दल माफी मागितली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख