दक्षिण दिग्विजयासाठी भाजपची मोहीम सुरू...अमित शहा तमिळनाडूत दाखल - union home minister amit shah reaches at chennai for inauguration of development works | Politics Marathi News - Sarkarnama

दक्षिण दिग्विजयासाठी भाजपची मोहीम सुरू...अमित शहा तमिळनाडूत दाखल

मंगेश वैशंपायन
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तमिळनाडूत पक्ष विस्तार करण्यासाठी भाजपने आक्रमक धोरण आखले आहे. भाजपसाठी तमिळनाडून कितपत पोषक वातावरण आहे याचा अंदाज घेण्यासाठी खुद्द अमित शहा तेथे पोचले आहेत. 

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने आता तमिळनाडूकडे लक्ष वळविले दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजपने  जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. शहांच्या चेन्नई दौऱ्याने तमिळनाडूतील वातावरण तापले आहे. 

शहा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला होता. शहांच्या दौऱ्यानंतर बंगालमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्ष सावध भूमिका घेत आहेत. विकास योजनांच्या उद्गाटनासाठी असलेल्या दौऱ्याची माहिती देताना स्वतः शहा यांनी, संघटनात्मक कामासाठी आपण चेन्नईला पोहोचलो असे ट्‌विटरवर जाहीर केले आहे. 

हिंदी व ब्राह्मणविरोधी द्राविडी पक्षांचे वर्चस्व राहिलेल्या या दक्षिणी राज्यात भाजपला अत्यल्प जनाधार आहे. शहा यांनी भाजपच्या तमिळनाडू पदाधिकाऱ्यांबरोबर बूथ पातळीवरील कामाचा आढावा घेतला. शहा यांच्या आगमनाबरोबरच तमिळनाडूतील राजकारणही तापले आहे. भाजपबरोबर केंद्रात सहमतीची युती असलेल्या सत्तारूढ अण्णाद्रमुकच्या एका गटाने भाजपच्या वेल यात्रेला पुन्हा विरोध केला आहे. 

शहा यांनी भाजपसाठी अतिशय आव्हानात्मक अशा पश्‍चिम बंगाल व तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूतही पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहा हे या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. अळगिरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकमध्ये उपेक्षित असल्याच्या भावनेतून अळगिरी अस्वस्थ आहेत. ते लवकरच द्रमुक के (कलैग्नार) या नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने शहा-अळगिरींबरोबर चर्चा करतील असे सांगण्यात येते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख