गुड न्यूज : प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस...देशात आणखी सात लशींवर काम सुरू - union health minister harsh vardhan says india working on 7 more covid 19 vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस...देशात आणखी सात लशींवर काम सुरू

वृत्तसंस्था
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली असून, प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, सध्या देशात कोरोनाच्या दोन लशी उपलब्ध आहेत. देशात आणखी सात कोरोना लशी बनवण्याचे काम सुरू आहे. भारत हा अतिशय मोठा देश असल्याने संशोधन सर्वापर्यंत पोचून फायदा व्हावा यासाठी यात अनेक जणांचा सहभाग असायला हवा. म्हणूनच आणखी लशींवर काम सुरू आहे. याचबरोबर 50 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याची सुरवात मार्चपासून होईल. 

देशात काम सुरू असलेल्या सात कोरोना लशींपैकी तीन लशींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. दोन लशी वैद्यकीय चाचण्यांच्या आधीच्या टप्प्यावर आहेत. एक लशीची पहिल्या टप्प्यातील तर दुसऱ्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे, असे डॉ.हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. 

असाही आदर्श...अदर पूनावालांनी आधी केलं अन् मग सांगितलं..!

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल. 

कोरोना लसीकरण मोहिमेची सुरवात करताना मोदी म्हणाले होते की, खूप दिवसापासून कोरोना लशीची प्रतिक्षा होती. प्रथम कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मदत देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खर्च सरकार उचलणार आहे. कोरोना काळात सरकारने अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवनाला महत्व दिले.'' 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख