मोठी बातमी : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची कोरोनाने घेतली विकेट 

मागील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेदेशात कोरोनाने घातलेले थैमान त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet
Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार केला जात असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्ष वर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आरोग्य राज्यमंत्री अश्वनी चौबे यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात घातलेले थैमान त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे. (Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet)

भारतात अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यात केंद्र सरकारला यश मिळाले होते. पण दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना मोठे हाल झाले. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येने देशाची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. अनेकांचा बेड, ऑक्सिजन, औषधांअभावी मृत्यू झाला. अजूनही ही लाट ओसरली नाही. या लाटेचा अंदाजच आरोग्य विभागाला आला नाही. त्यामुळे केंद्र सरकारसह नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेलाही तडा गेला. 

देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याचा वेग तुलनेने कमी होता. तसेच कोरोना लशींचे वितरण, तुटवडा यामुळेही देशात मोठा वाद झाला. राज्यांना लस खरेदी करण्याचे अधिकार दिल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा निर्णय बदलण्यात आला. या बाबी आरोग्यमंत्री डॅा. हर्ष वर्धन यांना भोवल्याचे बोलले जात आहे. त्यातून आजचा कॅबिनेट विस्तार होत असताना त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे समजते. त्यांच्यासोबत आरोग्य राज्यंमत्री अश्वनी चौबे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

आज देशात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 3 कोटी 6 लाख 63 हजार 665 एवढे आहेत. त्यापैकी 2 कोटी 97 लाख 99 हजार 534 रुग्ण बरे झाले असून सध्या 4 लाख 59 हजार 920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4 लाख 4 हजार 211 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. तसेच कोरोना रुग्णांचा आकडाही वेगाने वाढला आहे. 

दहा मंत्र्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा

आज सायंकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाचा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. कालपासून एकूण दहा मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू असतानाचा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. कालपासून एकूण दहा मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे तीन राज्यमंत्री होते परंतु, यातील दानवे आणि धोत्रे यांची गच्छंती झाली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

हेही वाचा : महाराष्ट्राला 5 मंत्रिपदे? राणेंसह राज्यातील पाच नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल 
 
केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. तसेच, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com