आरोग्य मंत्रालयाचा घोळात घोळ! मंत्री अन् सचिवांनी दिले वेगवेगळे आकडे

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून, दररोज विक्रमी रुग्णसंख्या वाढत आहे. यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील नवीन घोळ समोर आला असून, महामारीच्या काळातही समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
union health minister and chief secretory gave different numbers of about covid19
union health minister and chief secretory gave different numbers of about covid19

नवी दिल्ली  : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महामारीच्या काळात सरकारी यंत्रणांमध्ये चांगला समन्वय असावे, अशी अपेक्षा असताना आरोग्य मंत्रालयातील  सावळागोंधळ उघड झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि आरोग्य सचिवांनी वेगवेगळी आकडेवारी जाहीर केल्याने हा सर्व घोळ समोर आला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या पातळीवरील गोंधळाच्या स्थितीवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे.  

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत बोलताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३५ लाख ४२ हजार ६६३ असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमारे ५ तासांनी आरोग्य मंत्रालयाच्याच मुख्य सचिवांनी हा आकडा ३९ लाख सांगितला. देशात इतक्‍या कमी कालावधीत ४ ते ५ लाख रूग्ण बरे होत असतील तर साऱ्या जगानेच हे भारताचे असे अनुकरण करावी, अशी उपहासात्मक चर्चा यामुळे रंगली. 

आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, देशातील कोरोनाची एकूण रूग्णसंख्या ४५ लाख ६२ हजार ४१४ आहे. त्यातील ९२ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. केवळ ५.८ टक्के लोकांनाच ऑक्सि‍जन उपचारांची गरज लागली आहे. फक्त १.७ टक्के रूग्ण अतिदक्षता विभागात आहेत. मृतांची संख्या ७६ हजार २७१ आहे. आतापावेतो एकूण रूग्णांच्या ७७.६५ टक्के म्हणजे ३५,४२,६६३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मुख्यत: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू , कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, तेलंगण, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरातमधूनच सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.

केंद्र सरकारने वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे अंदाजे १४ ते २९ लाख रूग्णसंख्या कमी झाली. तसेच, तब्बल ३८ हजार लोकांचे जीव वाचविता आले, असा दावाही आरोग्य मंत्र्यांनी केला. दरम्यान, देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून, मागील एका आठवड्यात ७६ लाख चाचण्या करण्यात आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे.  

आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनानंतर आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, देशात ३८ लाख ५० हजारांहून जास्त जण बरे झालेले आहेत. आज संपलेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ४०९ रुग्ण दगावले आहेत. 

देशात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज केला. देशात सध्या ६९०० दशलक्ष टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्याची काहीही कमतरता नाही. महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रत्येकी ५० हजारांहून जास्त रूग्ण आहेत. त्यातही सर्वाधिक २९ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण सांगितले.  

सर्वाधिक रुग्ण असलेली राज्ये (टक्केवारी) 
महाराष्ट्र : २९ 
आंध्र प्रदेश : ९ 
कर्नाटक : १० 
उत्तर प्रदेश : ६.८ 
तमिळनाडू : ४.७ 

९ ते १५ सप्टेंबरदरम्यान झालेले मृत्यू 
महाराष्ट्र : ४०९ 
कर्नाटक : १२१ 
उत्तर प्रदेश : ७३ 
आंध्र प्रदेश : ६९ 
तमिळनाडू : ७२ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com