कोरोनाचा उद्रेक झाल्याने शंका असूनही सरकारची भिस्त 'कोव्हिशिल्ड'वरच!

देशात कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचा वापर सरकारडून लसीकरणासाठी होत आहे. या लशीचा वापर काही युरोपीय देशांनी तात्पुरता थांबवला आहे.
union government relies on covishield corona vaccine
union government relies on covishield corona vaccine

नवी दिल्ली : लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे या बड्या युरोपीय देशांनी ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. कोव्हिशिल्डचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. मात्र, देशातील कोरोना रग्णांची संख्या 3 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेल्याने केंद्र सरकारची भिस्त कोव्हिशिल्डवरच आहे. आता सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर थांबवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी लसीकरण समितीचे प्रमुख विनोदकुमार पॉल म्हणाले की, काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे म्हणणे आहे. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला आहे. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती त्यातील 30 जणांना त्रास झाला आहे. याची तपासणी तेथील यंत्रणांमार्फत सुरू आहे. भारतात जानेवारीच्या मध्यापासून 3.6 कोटी जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यात कोव्हिशिल्ड लशीचे प्रमाण अधिक आहे. भारतात असा प्रकार झालेला आढळलेला नाही. त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीचे लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरू राहील. 

पॉल म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली. आज रुग्णसंख्येने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. यामुळे सरकार लसीकरणाचा वेग वाढवत आहे. आम्ही कोव्हिशिल्डसोबत भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेली स्वदेशी लस कोव्हॅक्सिनही देत आहोत. 

देशात आज कोरोनाचे 28 हजार 903 रुग्ण आढळले आहेत. ही मागील वर्षातील 13 डिसेंबरनंतरची उच्चांकी पातळी आहे. याचवेळी 188 जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा मागील दोन महिन्यांत सर्वाधिक ठरला आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून उपाययोजनांचा आज आढावा घेतला. 

यापूर्वी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनीही लशीचा वापर थांबवला आहे. त्यानंतर आता जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला आहे. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे. 

भारतामध्ये अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, भारतात या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे भारतातील लसीकरण सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतात कोव्हॅक्सिन या लसीचा वापरही होत आहे. दोन्ही लसींच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com