हाथरसमध्ये 'आप'चे खासदार संजयसिंह यांच्यावर 'शाईहल्ला' - unidentified person throw ink at the Aam Aadmi Party delegation in Hathras | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरसमध्ये 'आप'चे खासदार संजयसिंह यांच्यावर 'शाईहल्ला'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती समोर येऊ लागली आहे.  

लखनौ : हाथरस येथील दलित मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजयसिंह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरसला गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीने या शिष्टमंडळावर शाई फेकली. याचबरोबर या शिष्टमंडळाच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्याने त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यामुळे मोठा गदारोळ उडाला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. 

आपचे खासदार संजयसिंह यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलण्याच्या तयारीत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. तसेच, घोषणाबाजी सुरू केली. या शिष्टमंडळाने तेथून निघून जावे यासाठी त्याने आरडाओरड सुरू केली. यामुळे मोठा गदारोळ उडाल्याने खासदार सिंह हे शिष्टमंडळासह तेथून निघून गेले. या प्रकरणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भीम आर्मीचे प्रमुखे चंद्रशेखर आझाद यांनी काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी आझाद यांनी पीडितेला 'वाय' सुरक्षा देण्याची मागणी केली होती. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणी तपास व्हावी, असे त्यांनी म्हटले होते. कंगना राणावतला जर वाय सुरक्षा मिळत असेल तर या कुटुंबाला का नाही, असा सवालही त्यांनी केला होता. जमावबंदी आदेश आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आझाद यांच्यासह सुमारे 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, भाजपचे माजी आमदार राजवीरसिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी सवर्णांची बैठक  काल बोलावली होती. हाथरसमध्ये जमावबंदी आदेश असून, पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास मनाई आहे. तरीही या बैठकीला सुमारे सातशे ते आठशे सवर्ण उपस्थित होते. या बैठकीसाठी राजवीरसिंह यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी राजवीरसिंह यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख