गोस्वामींना मोबाईल वापरायला दिला अन् बसले नोकरी गमावून..! - two police officials suspended after they gave mobile to arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

गोस्वामींना मोबाईल वापरायला दिला अन् बसले नोकरी गमावून..!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत मोबाईल देणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. सुरूवातीला गोस्वामी हे कागदोपत्री कारागृहात असले तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम मात्र, अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच होता. परंतु, गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात केली होती. आता गोस्वामी यांना मोबाईल वापरायला देणाऱ्या पोलिसांच्या नोकरीवर संक्रात आली आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडी असली तरी कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना कारागृहात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. अलिबाग कारागृह प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था या शाळेत केली आहे. 

अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला कारागृहात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते. 

नंतर शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे समोर आले. यामुळे त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले होते की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग कारागृहाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा कारागृहात हलवले.  

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. इतर कैद्यांकडेही याबाबत चौकशी करण्यात आली. या वेळी कारागृहातील दोन पोलीस कर्मचारी पैसे घेऊन कैद्यांना स्वतःचा मोबाईल वापरण्यासाठी देत असल्याचे समोर आले. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख