कुंभमेळ्यात कोरोना पसरवला कुणी? आता आखाड्यांमध्येच जुंपली

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यावरुन आता कुंभमेळ्यात वाद निर्माण झाला आहे.
two main akharas blame each other for spread of covid 19 in kumbh mela
two main akharas blame each other for spread of covid 19 in kumbh mela

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कुंभमेळ्यात आता कोरोना कुणामुळे पसरला यावरुन वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर आखाड्यांमध्ये जुंपली आहे. संन्यासी आखाड्यामुळे कुंभमेळ्यात कोरोना पसरला असा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. याचबरोबर काही आखाड्यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.  

बैरागी आखाडा आणि निर्मोही आखाड्याने कुंभमेळ्यात कोरोना पसरवण्यास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना जबाबदार धरले आहे. आतापर्यंत 50 हून अधिक साधू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात महंत नरेंद्र गिरी यांचा समावेश आहे. याचबरोबर निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निरंजनी आखाड्याचे अनेक साधू पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील दोन हजार 200 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा वाढेल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत दोन हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com