ट्विटरसह फेसबुक, इन्स्टाग्रामने दणका दिला अन् ट्रम्प म्हणाले, आता आमचा सोशल मीडिया!

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एका मानहानीला सामोरे जावे लागले आहे. यावरही ट्रम्प यांनी माघार घेतलेली नाही.
twitter permanently ban us president donald trump for inciting violence
twitter permanently ban us president donald trump for inciting violence

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर आता अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी आणखी एक मानहानी पडली आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉलवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्विटरने १२ तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले होते. आता त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम यांनीही ट्रम्प यांचे अकाऊंट तात्पुरते बंद केले आहे. यावर ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. 

भविष्यात हिंसाचाराला चिथावणी मिळण्याचा धोका असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. कॅपिटॉलवरील हिंसाचार भडकण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विटरवरून व्हीडिओ संदेशाद्वारे समर्थकांनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांचे ट्विटरवर ८ कोटी ८७ लाख फॉलोअर असून, जगभरातील सर्वाधिक फॉलोअर असलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही त्यांचे फॉलोअर अधिक आहेत. 

नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी होत आहे. त्या वेळीही ट्रम्प समर्थकांकडून मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ट्रम्प हे पुन्हा एकदा अशी चिथावणी देण्याची शक्यता असल्याने संभाव्य हिंसा टाळण्यासाठी ट्विटरने त्यांचे अकाऊंटच बंद केले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून गेल्या काही दिवसांत केले गेलेले ट्विट आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादांचा आढावा घेतल्यानंतर भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी आम्ही हे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करीत आहोत. 

याविषयी ट्विटरने निवेदन जाहीर केले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, सर्वच नागरिकांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे थेटपणे ऐकता यावे, असे आमचे धोरण आहे. प्रत्येकालाच म्हणणे मांडण्याचा आणि या मंचावर अकाऊंट सुरु करण्याचा अधिकार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांचा आढावा घेता, हे अकाऊंट आमच्या नियमांपेक्षा वरचढ ठरु शकत नाही, हे आम्ही निश्‍चित केले. ट्विटरचा वापर करून कोणीही हिंसाचाराला चिथावणी देऊ शकत नाही. 

ट्रम्प यांची मागील काही काळातील विधाने आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद याचा आम्ही अभ्यास केला. बायडन यांच्या शपथविधीला जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर करून अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेवर अविश्‍वास व्यक्त केला आहे. त्यांचे हे ट्वीट हिंसाचारालाही चिथावणी ठरू शकते. त्यांनी त्यांच्या समर्थकांसाठी देशभक्त शब्द वापरला आहे. त्यामुळे कॅपिटॉलवरील हिंसाचारात सहभागी असणारे देशभक्त असल्याचा अर्थ निघू शकतो. त्यामुळे सत्तेचे हस्तांतर फार सहजपणे होऊ द्यायची ट्रम्प यांची इच्छा नाही, असे दिसते, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.  

ट्विटरच्या या कारवाईवरुन माघार घेण्यासा ट्रम्प यांनी नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे असे घडणार याचा मला आधीच अंदाज होताच. आम्ही इतर संकेतस्थळांबरोबर चर्चा करीत आहोत. भविष्यात आम्ही स्वत:चा सोशल मीडिया सुरु करू. आम्हाला गप्प बसविता येणार नाही. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com