भाजपमध्ये दुफळी; प्रदेशाध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष पेटला - Tussle in Rajasthan BJP president and Vasundhara Raje over CM post | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये दुफळी; प्रदेशाध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष पेटला

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे.

जयपुर : राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील अंतर्गत कलह आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे अन् प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Puniya) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून वसुंधरा राजे यांच्या सहा समर्थकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याने वाद पेटला आहे. (Tussle in Rajasthan BJP president and Vasundhara Raje over CM post)

राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री पदासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवास मुख्यमंत्री पदासाठी लायक कोणताही नेता नाही. त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्य त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. त्यामुळं पक्षात दोन गट पडले आहेत. 

हेही वाचा : भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार की धुतळ्या तांदळासारखे?

या वक्तव्यांमुळं वसुंधरा राजे यांचे निकटवर्ती व भाजपचे ज्येष्ठ नेते रोहिताश्व शर्मा यांच्यासह सहा जणांना प्रदेश कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला पंधरा दिवसांत उत्तर मागितले आहे. यामध्ये प्रदेश महामंत्री भजनलाल, प्रताप सिंह सिंघवी यांचाही समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना अशाप्रकारची नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतूनच तसे आदेश आले असून या नेत्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे. 

देशात काँग्रेसचे जशी स्थिती आहे, तशी स्थिती राजस्थानमधील भाजपची झाल्याची टीका शर्मा यांनी केली होती. या घडामोडींवर वसुंधरा राजे यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलं नसलं तरी समर्थकांकडून वेगळी चूल मांडली जात आहे. भाजपपासून फारकत घेत अनेक कार्य़क्रमांचे आयोजन केले जात आहे. वसुंधरा यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. 

प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी यावरून टीका केली आहे. पक्षातील बेशिस्तीबाबत केंद्रीय नेतृत्वाला माहिती दिली जाईल. भाजपचा मुख्यमंत्री पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. घरात बसलेले नेते हे ठरवत नाहीत. हा पक्ष संघटनेवर आधारीत असून प्रत्येक कार्यकर्ता एकसमान आहे, असा टोला पूनिया यांनी लगावला. भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी कुणाला एकाच व्यक्तीच्या मागे जायचं असेल तर पक्ष सोडावा लागेल, असा इशारा दिला आहे. 

हेही वाचा : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तेवीस गावांबाबत अजितदादांचा मोठा निर्णय

प्रदेशाध्यक्षांचं 22 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांचे हे पत्र आहे. पूनिया यांनी हे पत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असताना लिहिलं होतं. आता 22 वर्षांनंतर याच पत्रानं त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. वसुंधरा राजे व पुनिया यांच्यातील संघर्षातूनच हे पत्र बाहेर आणल्याची चर्चा आहे. त्यांनी पत्रात माजी मुख्यमंत्री भैरव सिंह शेखावत, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गुलाबचंद कटारिया, ललित किशो चतुर्वेदी आणि हरीशंकर भाभडा यांच्यावर पाठीत खंजिर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपले तिकीट कापल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

पुनिया यांना त्यावेळी विधानसभेचे तिकीट हवे होते. पण तिकीट कापल्यानं त्यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत 1999 मध्ये हे पत्र कटारिया यांना उद्देशून लिहिलं होतं. 'शेखावत, राजेंद्र राठौड आणि राम सिंह कसवा यांचे आपण कट्टर समर्थक आहे. दिल्लीला जाईपर्यंत मला तिकीटाचे संकेत देण्यात आले होते. पण या लोकांनी दिल्लीत बाजी पलटवली. माझ्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. राज्यातील कार्यकर्ते हा अपमान सहन करण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहण्याची माझी मानसिकता नाही, असे पूनिया यांनी पत्रात लिहिलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख