चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांचे राज्यात उद्या आगमन होत असल्याने अण्णाद्रमुक सरकार धास्तावले आहे. या पार्श्वभूमीवर शशिकलांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही.दिनकरन यांनी मोठे वक्तव्य केले असून, यावरुन गदारोळ सुरु झाला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या उद्या (ता.8) तमिळनाडूत परतणार आहेत.
शशिकलांचे शंभर समर्थक मानवी बॉम्ब बनून तयारीत...सरकारची पोलीस महासंचालकांकडे धाव
याबाबत बोलताना शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाचे सरचिटणीस आमदार दिनकरन म्हणाले की, शशिकला या तमिळनाडूत परतल्यानंतर अण्णाद्रमुकशी असलेल्या वादाचा शेवट गोड होईल. शशिकला या विधानसभा निवडणूकही लढवतील. याचबरोबर शशिकला याच अण्णाद्रमुकचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतील. अण्णाद्रमुकसोबतचा आमच्या वादाचा शेवट झाल्यानंतर राज्यात द्रमुक सत्तेवर येणार नाही. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचे सत्तेवर येण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत.
शशिकला यांना चार वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांना शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यापासून पुढे सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी आहे. असे असतानाही त्या निवडणूक कशी लढवणार, हे दिनकरन यांनी स्पष्ट केलेले नाही. याचबरोबर अण्णाद्रमुकशी समझोता होण्याबाबत नेमकी काय चर्चा झाली अथवा कोणता तोडगा निघाला यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, त्यांच्या या विधानामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav

