चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. शशिकलांचे राज्यात पुनरागमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. कर्नाटक सीमेपासून चेन्नईपर्यंत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी जमलेले लाखो कार्यकर्ते पक्षाचे होते की भाडोत्री असा वाद आता निर्माण झाला आहे.
शशिकलांचे नुकतेच राज्यात आगमन झाले. त्यावेळी अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली होती. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या होत्या.
हेही वाचा : शशिकलांच्या पुनरागमनाने अण्णाद्रमुक 'मायनस'मध्ये तर भाजप 'प्लस...
अण्णाद्रमुक सरकारमधील मंत्री जयकुमार यांनी शशिकलांचे स्वागत करणारे लाखो कार्यकर्ते हे भाडोत्री असल्याचे म्हटले आहे. शशिकलांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांनीच पैसे देऊन ही गर्दी जमवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शशिकला आणि दिनकरन हे राज्यात हिंसाचार पसरवणार असल्याचा आरोप करीत जयकुमार यांनी नुकतीच राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली होती.
या आरोपांवर शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी आजपर्यंत कधीही कोणत्या नेत्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालेले पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने मोठे निर्बंध घालून आणि दबाव टाकूनही कार्यकर्ते जमले. प्रचंड गर्दी जमूनही कोणताही हिंसाचार झाला नाही आणि सगळे काही लष्करी शिस्तीत पार पडले. अनेक नेत्यांनी ही गर्दी केवळ हिंसाचारासाठी जमवली आहे, असे वाटत होते. शशिकलांच्या स्वागतासाठी जमलेले सगळे जण हे अम्माचे खरे कार्यकर्ते होते.
हेही वाचा : शशिकलांच्या सुटकेनंतर धास्तावलेले मुख्यमंत्री म्हणाले, त्यांच्या भाच्याच्या नादी लागू नका!
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav

