मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याच्या तयारीत वायएसआर कन्या!

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कन्या वाय.एस.शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे.
TRS MLA Tatikonda Rajaiah meet Y S Sharmil says sources
TRS MLA Tatikonda Rajaiah meet Y S Sharmil says sources

हैदराबाद  : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कन्या वाय.एस.शर्मिला (Y.S.Sharmila) यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे. आता त्यांनी तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती (TRS) आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. टीआरएसचे आमदार शर्मिला यांच्या संपर्कात असून, ते लवकरच पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. 

वायएसआर यांचे निष्ठावंत असलेले अनेक नेते टीआरएसमध्ये आहेत. ते आता शर्मिला यांच्या संपर्कात आहेत. टीआरएसचे आमदार ताटीकोंडा राजय्या यांनी नुकतीच शर्मिला यांची त्यांच्या लोट्स पाँड या निवासस्थानी भेट घेतली. याचबरोबर त्यांनी शर्मिला यांचे पती अनिल कुमार यांचीही भेट घेतली. राजय्या हे वायएसआर यांचे निष्ठावंत होते. त्यामुळे राजय्या हे शर्मिला यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

शर्मिला या मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या भगिनी आहेत. शर्मिला यांच्या पक्ष स्थापनेचा जंगी कार्यक्रम हैदराबादमध्ये झाला होता. तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, शर्मिला यांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. शर्मिला यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री वाय.एस. विजयालक्ष्मी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला, त्यावेळीही विजयलक्ष्मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. शर्मिला आणि विजयालक्ष्मी यांनी पक्षस्थापनेच्या आधी वायएसआर यांच्या स्मारकाला भेट दिली होती. 

काही दिवसांपूर्वी हैदराबाद ते खम्मम अशी मोठी रॅली शर्मिला यांनी काढली होती. नंतर त्यांनी खम्मम येथे जाहीर सभा घेतली. शर्मिला यांनी त्यांचे वडील आंध्र प्रदेशचे (अविभाजित) माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस.आर. रेड्डी यांच्या समर्थकांची बैठक आधी घेतली होती. ही बैठक त्यांनी त्यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी घेतली होती. या बैठकीत पक्षाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनाचा मुहूर्त पक्षस्थापनेसाठी निवडण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com