तृणमूलचं ठरलं! गोव्याची धुरा महुआ मोईत्राच सांभाळणार

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत.
Mahua Moitra
Mahua Moitra Sarkarnama

पणजी : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (TMC) राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. गोव्यात पुढील वर्षी विधानसभा (Goa Assembly Election) निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता गोव्याची धुरा पक्षाच्या आक्रमक खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महुआ मोईत्रा या राष्ट्रीय पातळीवर तृणमूलची भूमिका मांडण्याचे काम करतात. याचबरोबर त्या भाजपलाही आक्रमकपणे उत्तर देत असतात. त्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी काढले आहे. पक्षाच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही नियुक्ती तातडीने लागू झाली आहे, असे पक्षाने म्हटले आहे. याबद्दल महुआ मोईत्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या संधीबद्दल ममता बॅनर्जींचे आभार मानले आहेत. चांगले काम करून दाखवेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने फलेरो यांच्या नावाची घोषणा राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी केली आहे. फलेरो हे तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळाली आहे. तृणमूलचे संख्याबळ पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ही पोटनिवडणूक 29 नोव्हेंबरला होणार आहे. त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीतही पक्ष उतरवणार आहे.

Mahua Moitra
प्रदेशाध्यक्ष वेळेत न आल्याने काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदाराने शपथच घेतली नाही!

फलेरो हे गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होतं. पण त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला होता. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता पक्षाच्या गळाला लागला आहे.

Mahua Moitra
काँग्रेस सोडलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार अन् विधानसभाही लढणार!

फलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात कोलकता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नऊ जणांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. फलेरो यांच्यासह गोवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक व विजय वासुदेव पोय, माजी राज्य सचिव मारिओ पिंटो डी सँटना व आनंद नाईक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी शिवदास सोनू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व माजी आमदार लहू मामलेदार, दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष अँटोनियो मोंटेरिओ क्लोविस दा कोस्टा, राजेंद्र शिवाजी काकोडकर हे तृणमूलमध्ये दाखल झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com