पेगॅससवरून रणकंदन; केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून फाडली - TMC MP tears Ashwini Vaishnaws statement on Pegasus project-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पेगॅससवरून रणकंदन; केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून फाडली

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून गुरूवारी राज्यसभा दणाणून गेली. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर बोलत असतानाच तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतुनू सेन (Shantunu Sen) यांनी त्यांच्या हातातील निवेदन हिसकावून घेत फाडले. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि सेन यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. (TMC MP tears Ashwini Vaishnaws statement on Pegasus project)

राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत खुद्द वैष्णव यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल,  काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग अन् वनमंत्री अडचणीत

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभेत वैष्णव यांनी याबाबत पहिल्याच दिवशी निवेदन दिलं आहे. तर राज्यसभेत निवेदन सादर करण्यासाठी तृणमूलसह इतर विरोधी पक्षांचे खासदार सभागृहातील सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले.

त्यानंतर वैष्णव यांनी सभागृहात निवेदन देण्यास सुरूवात केल्यानंतर सेन यांनी त्यांच्या हातातील निवेदन हिसकावून घेतले. सेन यांनी ते निवेदन फाडत ते भिरकावून दिले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. या गोंधळामुळं वैष्णव यांना आपलं निवेदन पूर्ण करता आले नाही. त्यांनी थोडक्यात बोलत हेरगिरीचे आरोप धुडकावून लावले. संबंधितांनी अशी हेरगिरी झाली नसल्याचे स्पष्ट केल्याचे वैष्णव यांनी सांगितले. त्यानंतर काही काळासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. 

याचदरम्यान, सेन आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, या सभागृहातील या प्रकारावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे खासदार स्वपन दासगुप्ता म्हणाले, वैष्णव हे निवेदन सादर करत होते. त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. पण सभागृहामध्ये अशाप्रकारची गुंडगिरी चुकीची आहे. हे सर्व नियमांच्या विरूध्द असून त्याचा निषेध व्हायला हवा, असे दासगुप्ता म्हणाले. तर खासदार महेश पोद्दार यांनीही तृणमूलवर निशाणा साधला. बंगालमध्ये ते विरोधकांना मारू शकतात, महिलांशी कसेही वागतात, मग ते काहीही करू शकतात. आत त्यांनी सभागृहात पेपर फाडले, उद्या त्यांनी कपडे फाडले तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका पोद्दार यांनी केली.

दरम्यान, इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख