रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नव्हे; नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा - tmc mp nusrat jahan slams bjp over sloganeering in netaji bose program | Politics Marathi News - Sarkarnama

रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नव्हे; नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा

वृत्तसंस्था
रविवार, 24 जानेवारी 2021

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. 

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात श्रीरामांचा जयघोष झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख  व  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करीत त्यांचे भाषण थांबवले होते. आता तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनीही या संपू्र्ण प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नव्हे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त काल (ता.23) पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या होत्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण बंद केले होते. 

या प्रकारावर नुसरत जहाँ यांनी ट्विट केले आहे. रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही, असे ट्विट करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली, त्याचा मी निषेध करते, असे नुसरत जहाँ यांनी म्हटले आहे. 

काल सकाळी कोलकत्यामध्ये पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला. निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजींची आठवण येत आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. कालच्या व्हिक्टोरिया मेमोरियल कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले. परंतु, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. 

ममता या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या  होत्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख