मुकुल रॉय यांची आमदारकी गेल्यास सुवेंदू अधिकारींच्या वडिलांची खासदारकी जाणार! - tmc demands resignation of suvendu adhikari father mp sisir adhikari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

मुकुल रॉय यांची आमदारकी गेल्यास सुवेंदू अधिकारींच्या वडिलांची खासदारकी जाणार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जून 2021

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यात भाजपला गळती लागली आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची नुकतीच तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) घरवापसी झाली आहे. मुकुल रॉय हे आमदार म्हणून निवडून आले त्यांची असून, त्यांची आमदारकी रद्द करावी, यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आता मैदानात उतरले आहेत. मात्र, रॉय यांची आमदारकी रद्द झाल्यास अधिकारींच्या वडिलांच्या खासदारकीही रद्द होऊ शकतो, असा पेच निर्माण झाला आहे. 
 
सुवेंदू अधिकारींनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुकुल रॉय यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे. रॉय हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले असून, नंतर ते तृणमूलमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांना आमदारपदी राहण्याचा अधिकार नाही. 

मुकुल रॉय हे भाजपच्या तिकिटावर कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे तृणमूलच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीआधी सुवेंदू यांच्यासोबत शिशिर अधिकारीही भाजपमध्ये गेले होते. त्यांनी अद्याप खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. 

आता रॉय यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सुवेंदू अधिकारींनी केल्यानंतर तृणमूलने शिशिर अधिकारींचा मुद्दा उपस्थित केला आहे. तृणमूलचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी आधी त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांना राजीनामा देण्यास सांगावे. त्यांच्या वडिलांनी मार्चमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांनी अद्याप तृणमूलच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे सुवेंदू यांनी आधी त्यांच्या वडिलांना राजीनामा देण्यास सांगावा आणि नंतर आम्ही त्यांचे अनुकरण करु.  

हेही वाचा : मुकुल रॉय यांची आमदारकी हिरावून घेण्याची भाजपची रणनीती 

भाजपमध्ये असताना मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले होते. त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले. त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होतो. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत. यामुळे आगामी काळात अनेक भाजप नेते तृणमूलमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. अखेर त्यांची घरवापसी झाली असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख