मुख्यमंत्र्यांची 'डिनर डिप्लोमसी' फसली...पक्षाच्या 30 आमदारांनीच मारली दांडी!

कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत असताना मुख्यमंत्री येडियुरप्पांसमोरील अडचणीतही वाढ होत आहे.
thirty mlas of bjp absent from karnataka chief minister yediyurappa dinner
thirty mlas of bjp absent from karnataka chief minister yediyurappa dinner

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यातील खातेवाटपावरुन वाद होऊन मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांत चार वेळा मंत्र्यांचा खातेबदल करण्याचा विक्रम केला होता. येडियुरप्पांनी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी 'डिनर डिप्लोमसी'चा आधार घेतला होता. मात्र, या मेजवाणीला पक्षाच्या 30 आमदारांनी दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर नाराजीमुळे त्यांना 24 तासांत मंत्र्यांचा खातेबदल करावा लागला होता. तरीही नाराजी कायम होती. यामुळे नंतर पाच दिवसांत चार वेळा खातेबदल करण्यात आला होता. येडियुरप्पांनी एक प्रकारे खातेबदलाचा विक्रमच केला आहे. यात काही मंत्र्यांकडील मोठी खाती काढून त्यांना छोटी खाती देण्यात आली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांची नाराजी कायम आहे. 

पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी येडियुरप्पांना डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला होता. त्यांनी पक्षाच्या आमदारांसाठी मेजवाणीचे आयोजन केले होते. या मेजवाणीला पक्षाचे तब्बल 38 आमदार अनुपस्थित होते. यातील अनेक जणांना मंत्रिमंडळ विस्तारातही मंत्रिपदे मिळालेली नाहीत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार विरोधात गेल्याने येडियुरप्पांची डोकेदुखी वाढली आहे. 

दरम्यान, येडियुरप्पांच्या विरोधात भाजपचे 15 आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. हे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असलेले आहेत. ते याच महिन्यात दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर जाऊन गाऱ्हाणे मांडणार आहेत. येडियुरप्पांबद्दल दिवसेंदिवस राज्यातील भाजपमध्ये नाराजी वाढत आहे. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवावे, यासाठी भाजपचे 15 आमदार आक्रमक झाले आहेत. ते दिल्लीला या महिन्यात जाणार आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. 

मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी हे पुन्हा एकत्र आले आहेत. येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. याचबरोबर पुढील निवडणुका ते एकत्र लढू शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतिपदी भाजपचे एम.के.प्राणेश यांची नुकतीच निवड झाली आहे. जेडीएसच्या पाठिंब्यावर ही निवड झाली आहे. 

येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. येडीयुरप्पा आणि भाजप नेतृत्वाचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले आहेत. मात्र, राज्यात येडीयुरप्पा यांना डावलणे शक्य नसल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. येडीयुरप्पा यांच्यावर पदावरुन पायउतार होण्यासाठी दबाव आणल्यास ते नवीन पक्ष स्थापन करु शकतात, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. यासाठी ते जेडीएसची मदत घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com