सॉरी, माहिती नव्हतं! चिठ्ठी लिहून चोरट्याने परत केले कोरोना लशीचे सतराशे डोस

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. सरकारने लसीकरणावर भर दिला असला तरी अनेक ठिकाणी लशीची टंचाई निर्माण झाली आहे.
thief returns stolen covid vaccine doses to hospital in haryana
thief returns stolen covid vaccine doses to hospital in haryana

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. सरकारने लसीकरणावर भर दिला असला तरी देशात अनेक राज्यात लशीची टंचाई आहे. असे असताना भाजपशासित हरियानात मात्र, सरकारी रुग्णालयातून कुणीतरी  लशीचे 1 हजार 700 डोस चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. अखेर या चोरट्याने सॉरी असा संदेश लिहून हे डोस परत केले आहेत. परंतु, हे डोस वापरता येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंदमधील कोविड रुग्णालयात 21 एप्रिलला रात्री चोरीची घटना घडली. रुग्णालयातून कोव्हिशिल्डचे 1 हजार 270 डोस आणि कोव्हॅक्सिनचे 440 डोस चोरीला गेले. चोरट्यांनी स्टोअररुममधील इतर लशी, औषधे, रोख रक्कम यांना अजिबात हात लावला नाही. केवळे कोरोना लशीचे डोस घेऊन चोरटे पसार झाले. 

स्टोअररुमची स्वच्छता करण्यासाठी सकाळी कामगार आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्याला स्टोअर रुम आणि डीप फ्रिजरचे कुलूप उघडे दिसले. दरम्यान, रुग्णालयाकडे लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

चोरट्याने 12 तासानंतर हे कोरोना लशीचे डोस परत केले आहेत. त्याने रुग्णालयाबाहेरील चहाच्या टपरीवर हे डोस ठेवले. त्यासोबत त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली असून, त्याने त्यात सॉरी म्हटले आहे. याचबरोबर हे औषध कोरोनावरील आहे हे माहिती नव्हते असेही लिहिले आहे. चोरट्याने परत केलेले डोस वापरता येणार की नाही याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या संपूर्ण प्रकाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

देशात 18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर शनिवारपासून (ता.24) नाव नोंदवू शकतात. नाव नोंदवल्यानंतर ते लसीकरण केंद्रावर जाऊन नियोजित वेळी लस घेऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com