मोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली - thavar chand gehlot will be new governor amid big new reshuffle | Politics Marathi News - Sarkarnama

मोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत (Thavar Chand Gehlot) यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी (Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह चार नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

गेहलोत हे 83 वर्षांचे असून, त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार आहे. ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेले आहेत. आता त्यांच्यावर कर्नाटकच्या राज्यपालपदाची धुरा असेल. मंगूभाई छगनभाई पटेल हे गुजरातमधील भाजप नेते असून, त्यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाली आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार होता. राष्ट्रपतींनी हरी बाबू कंभमपती आणि राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची अनुक्रमे मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. कंभमपती हे आंध्र प्रदेशमधील भाजप नेते असून, अर्लेकर गे गोव्यातील भाजप नेते आहेत. 

मिझोरामचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. हरियानाचे राज्यपाल  सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरात तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बायस यांची झारखंडमध्ये बदली करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांची हरियानात बदली करण्यात आली आहे. 

हेही वाचा : नारायण राणे दिल्ली गेले अन् मंत्रिमंडळ विस्ताराची बैठकच रद्द 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. 

याचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि  बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख