कांदे फेकले नितीशकुमारांवर अन् राग आला तेजस्वी यादवांना...

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नितीशकुमार यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्तकेला आहे.
कांदे फेकले नितीशकुमारांवर अन् राग आला तेजस्वी यादवांना...
Tejashwi yadav furious over onions thrown at chief minister nitish kumar

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे जाहीर सभेवेळी कांदाफेकीने स्वागत करण्यात आले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याआधी एकदा नितीशकुमार यांना संतप्त जमावाकडून दगडफेकीचा सामना करावा लागला होता. या प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

नितीशकुमार यांची नुकतीच मधुबनी जिल्ह्यात जाहीर सभा होती. नितीशकुमारांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर गर्दीतील काही तरुणांना नितीश यांना कांदे फेकून मारले. यामुळे सुरक्षा यंत्रणांना तातडीने नितीशकुमारांभोवती सुरक्षा कडे उभारले. नंतर कांदे फेकणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. परंतु, नितीशकुमारांनी त्यांना सोडून देण्यास सांगितले. याआधी लालूप्रसाद यादवांचा बालेकिल्ला असलेल्या छपरामध्ये नितीशकुमारांच्या जाहीर सभेवेळी काही तरुणांनी गोंधळ घातला होता. 

या वेळी बोलताना संतप्त नितीशकुमारांनी या घटनेसाठी विरोधकांना जबाबदार धरले. कांदे  फेकणाऱ्या तरुणांना त्यांनी आणखी कांदे मारण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, आणखी कांदे मारा, जेवढे मन असेल तेवढे कांदे मारा. विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. राजकीय फायद्यासाठी ते जनतेला फसवत आहेत. अव्यहार्य आणि खोटी आश्वासने देणाऱ्या पक्षांपासून जनतेने दूर राहावे. माझ्यावर कांदे फेकणाऱ्यांना मी माफ करीत आहे.  

या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रचारसभेवेळी आदरणीय मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कांदे फेकण्यात आले. हे पूर्णत: निंदनीय, लोकशाहीच्या विरोधात आणि चुकीचे कृत्य आहे. लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार असून, त्याची अभिव्यक्ती केवळ मतदानातच व्हायला हवी. याच्या व्यक्तिरिक्त इतर कोणताही मार्ग स्वीकारार्ह होऊ शकत नाही. 

याआधी 12 जानेवारी 2018 रोजी नितीशकुमारांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बक्सर जिल्ह्यातील नंदन गावात ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांना दगडफेक करणाऱ्यासह इतर नागरिकांना बेदम मारहाण केली होती. त्यावेळी महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली होती.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  काल (ता.3) झाला असून, यात ९४ मतदारसंघ होते. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in