देशातील 2014 मधील मोदी लाटेप्रमाणेच बिहारमध्ये यंदा तेजस्वी लाट - Tejashwi wave is similar to Modi wave of 2014 says Congress leader Rajeev Shukla | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील 2014 मधील मोदी लाटेप्रमाणेच बिहारमध्ये यंदा तेजस्वी लाट

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि जेडीयूसमोर आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी आव्हान उभे केले आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सर्व रणधुमाळीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने तर 2014 मध्ये देशात आलेल्या मोदी लाटेप्रमाणे बिहारमध्ये आता तेजस्वी लाट आल्याचा दावा केला आहे. 

तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते तेजस्वी यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असल्याची बाब खासगीत मान्य करताना दिसत आहेत. यामुळे भाजपसह जेडीयूनेही धास्ती घेतली असल्याचेही चित्र आहे. 

आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी देशात 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेप्रमाणे बिहारमध्ये आता तेजस्वी लाट आल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार महाआआघाडीचे वादळ या निवडणुकीत आले आहे. महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांची लाट आली असून, ती देशातील 2014 मधील मोदी लाटेप्रमाणे आहे. 

याचवेळी भाजप आणि नितीशकुमार यांच्यात कुरबुरी सुरू आहेत. त्यांना कोण कोणासोबत आहे, हेच कळत नसल्याचे चित्र आहे. चिराग पासवान हे केंद्रातील एनडीएमध्ये सहभागी आहेत आणि राज्यात ते नितीश यांच्या विरोधात आहेत. पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला भाजपचा आतून पाठिंबा असून, नितीश यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख