राम मंदिरासाठी वर्गणी न देणाऱ्या शिक्षकाची संघप्रणित शाळेतून हकालपट्टी?

राम मंदिरासाठी निधी जमा करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान वर्गणी न देणाऱ्या शिक्षकाला संघप्रणित शाळेतून काढून टाकल्याचे समोर आले आहे.
teacher says school suspends him after denying donation for ram mandir
teacher says school suspends him after denying donation for ram mandir

नवी दिल्ली : अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी  मोहीम राबवण्यात आली होती. या मंदिरासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे. असे असताना विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत खर्चाच्या दीडपट जास्त म्हणजे २ हजार १०० कोटी रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. ही मोहीम संपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गणी न देणाऱ्या विद्यार्थ्याला संघप्रणित शाळेतून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

राम मंदिरासाठी एक हजार रुपयाची देणगी देण्यास नकार दिल्याने संघप्रणित शाळेतून काढून टाकल्याचा आरोप एका शिक्षकाने केला आहे. यशवंतसिंह, असे या शिक्षकाचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील जगदिशपूर येथे सरस्वती शिशू मंदिर येथे अध्यापनाचे कार्य करत होते. तसेच आठ महिन्यांपासून शाळेने वेतन रोखून धरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

याबाबत यशवंतसिंह यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले की, शाळेने राम मंदिरासाठी देणगी जमा करण्यासाठी पावतीपुस्तक दिले होते. मी प्रयत्न करून सुमारे ८० हजार रुपयांची देणगी जमा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक सत्येंद्र यांनी मला हजार रुपयाची देणगी देण्यास सांगितले. मात्र, देणगी देण्यास नकार दिल्यानंतर मला शाळेतून काढून टाकले. 

न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा यशवंतसिंह यांनी दिला आहे. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक धीरेंद्र यांनी शिक्षकाचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले,की शाळेच्या सर्व शिक्षकांना त्यांच्या क्षमतेनुसार पावतीपुस्तक देण्यात आले होते. सिंह यांना तीन पावतीपुस्तके देण्यात आली होती. त्यांनी ती जमा केली नाहीत. त्यानंतर त्यांनी स्वत:हून शिक्षक पदाचा राजीनामा दिला. 

याविषयी बोलताना संघाचे जिल्हा प्रचारक सत्येंद्र म्हणाले की, देणगी जमा करण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जात नाही. ते बेशिस्त असून ते कोणत्याच शैक्षणिक कार्यात रस घेत नव्हते. 

राम मंदिरासाठी अकराशे कोटी रुपांचा खर्च होईल, असा सुरवातीला अंदाज होता. नंतर हा अंदाज वाढून दीड हजार कोटी रुपयांवर गेला. प्रस्तावित मंदिराच्या पायासाठी नवी रचना केल्यामुळे हे चारशे कोटी रुपये वाढल्याचे सांगण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे महासचिव चंपत राय यांच्या माहितीनुसार हा खर्च आणखीही वाढू शकतो. 

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी यावर्षी संक्रांतीपासून देशभरात देणगी संकलनाची मोहीम सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील कार्यकर्त्यांनी पाच लाख गावांत जाऊन देणग्या जमा केल्या आहेत. या मोहिमेची सांगता झाली असून, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मंदिरासाठी २ हजार १०० कोटी रुपये जमा झाले आहेत. समर्पण निधीच्या १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या ४४ दिवसांच्या कालावधीती देशविदेशातील कोट्यवधी लोकांनी देणग्या दिल्या. 

याबाबत श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज म्हणाले की, अनेक लोकांनी देणग्या देऊ केल्या आहेत. मात्र आता खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने त्या स्वीकारायच्या की नाही याचा निर्णय जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. विदेशातील भारतीयांकडून देणगी देण्याबाबत अजूनही विचारणा होत आहे. यासाठी विहिंपने बँक खाते उघडले आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com