अखेर 68 वर्षांनी एअर इंडियाचे उड्डाण 'टाटा'च करणार

टाटा समूहाने तब्बल 18 हजार कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली आहे.
अखेर 68 वर्षांनी एअर इंडियाचे उड्डाण 'टाटा'च करणार
Air India, Tata Group

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची (Air India) मालकी टाटा समूकाकडे गेल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. टाटा समूहाने तब्बल 18 हजार कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली आहे. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूहातील टाटा सन्स कंपनीने लावलेली वित्तीय बोली मोदी सरकारने स्वीकारली आहे.

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव तुहीन कांत पांडे यांनी ही घोषणा केली आहे. टाटा सन्समधील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने 18 हजार कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली आहे. हा व्यवहार डिसेंबर अखेरपर्यंत पुर्णत्वास जाईल, असेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. एअर इंडिया कंपनीचा तोटा वाढत चालल्याने सरकारने कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

Air India, Tata Group
सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते; छापेमारीवर शरद पवारांचं वक्तव्य

एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांनी वित्तीय बोली लावलीे होती. केंद्र सरकारने एअरलाईन्समधील आपली 100 टक्के हिस्सेदारी विकली आहे. यामध्ये एअऱ इंडियातील 100 टक्के हिस्सा असलेली एआई एक्सप्रेस लि. आणि 50 टक्के हिस्सा असलेली एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

टाटा कंपनीची बोली अधिक ठरल्याने एअर इंडिया 68 वर्षांनी पून्हा टाटांकडे आली आहे. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सच्या नावाने एअर इंडियाची स्थापना केली होती. सरकारने 1953 मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर 68 वर्षांनी टाटांनी पुन्हा एअर इंडियाला समूहात आणले आहे.

दरम्यान, सरकारने नुकतंच म्हटलं होतं की, टाटा आणि स्पाईस जेट च्या बोलींचे मूल्यांकन सुरू करण्यात आलं आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया आता पुढील टप्प्यात पोहचली आहे. सरकार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यासाठी उत्सूक आहे. अघोषित आरक्षित मुल्याच्या आधारे वित्तीय बोलींचे मूल्यांकन केले जात आहे. ज्या बोलीमध्ये निश्चित मूल्याच्या अधिक किंमत दिली गेली असेल, त्या कंपनीची बोली स्वीकारली जाईल.

Related Stories

No stories found.