सर्वोच्च न्यायालयानंच म्हटलंय की, शशिकला अन् त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षाशी संबंध नाही! - tamil nadu minister d jayakumar says sasikala has no connection to aiadmk | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयानंच म्हटलंय की, शशिकला अन् त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षाशी संबंध नाही!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

शशिकला यांच्या चार वर्षानंतर राज्यात झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांनी न्यायालयात धाव घेत पक्षाने त्यांची केलेली हकालपट्टी चुकीची असल्याचा दावा केला आहे. यावर मत्स्योत्पादन मंत्री डी.जयकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत शशिकला आणि त्यांच्या समर्थकांचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

शशिकला यांनी चेन्नई न्यायालयामध्ये मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात नव्याने अर्ज केला आहे. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळीच शशिकला यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार १५ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

यावर बोलताना मत्स्योत्पादन मंत्री डी.जयकुमार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आधीच स्पष्ट आदेश दिला आहे. शशिकला आणि त्यांच्या समर्थकांचा अण्णाद्रमुकशी कोणताही संबंध नसल्याचे आदेशात म्हटले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीने शशिकला आणि त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी केली होती. शशिकलांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच मागणी होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली होती. 

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

चार वर्षाची शिक्षा भोगून शशिकला काही दिवसांपूर्वीच राज्यात परतल्या आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मोठी अस्वस्थता आहे. शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. त्यातच शशिकला यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख