सैयद जफर इस्लाम ठरणार भाजपचे सहावे मुस्लिम खासदार 

सैयद जफर इस्लाम विजयी झाल्यास जनसंघानंतर राजकीय पक्ष बनलेल्या भाजपचे गेल्या चार दशकांतील ते केवळ सहावे मुस्लिम खासदार ठरतील.
ss.jpg
ss.jpg

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने आपले राष्ट्रीय प्रवक्ते व एअर इंडियाचे संचालक सैयद जफर इस्लाम यांना उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मैदानात उतरविले आहे. ते विजयी होणे जवळपास नक्की मानले जाते. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपच्या गळाला लावण्यात इस्लाम यांनी बजावलेल्या कळीच्या भूमिकेचे बक्षीस त्यांना मिळाल्याचे मानले जाते. 

सैयद जफर इस्लाम विजयी झाल्यास जनसंघानंतर राजकीय पक्ष बनलेल्या भाजपचे गेल्या चार दशकांतील ते केवळ सहावे मुस्लिम खासदार ठरतील. सध्या भाजपच्या सुमारे 390 खासदारांपैकी राज्यसभेतून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे एकमेव शिया मुस्लिम खासदार आहेत. भाजपच्या संपूर्ण इतिहासात ज्येष्ठ नेत्या नजमा हेप्तुल्ला यांच्यासह नक़वी, सिकंदर बख्त (राज्यसभा) तसेच शहनवाज़ हुसेन व आरिफ बेग (लोकसभा) हे पाचच मुस्लिम नेते खासदार झाले आहेत. 

त्यातही लोकसभा निवडणुकीत कधी ना कधी भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले शाहनवाज, बेग व नक्वी हे तिघेच भाजपमधील आहेत. अगदी अलीकडे आरीफ महंमद खान यांनी भाजपचा हात धरल्यावर त्यांना राज्यपालपद देण्यात आले. मात्र, ते भाजपचे खासदार बनले नाहीत. हेप्तुल्ला मात्र प्र दीर्घकाळ भाजपमध्ये आहेत व पहिल्या मोदी सरकारमध्ये त्या अल्पसंख्यांक मंत्रीही होत्या. सध्या त्या राज्यपाल आहेत. 2014 मध्ये भागलपूरमधून अत्यंत अनपेक्षितपणे पराभूत झालेले शाहनवाज हुसेन यांचे भाजपमधील ग्रह मात्र अद्याप वक्रीच दिसत आहेत. 

सन 2014 च्या सत्तांतरानंतर किंवा त्याच्याच आसपास जफर तसेच रामीश सिद्दीकी यांच्यासारखे अनेक तरूण मुस्लिम नेते झपाट्याने भाजपकडे वळले. मोदी यांच्या 2014 मधील रणनीती ठरविणाऱ्या टीममध्येही जफर होते. ते इन्वह्स्टमेंट बॅंकर म्हणूनही ओळखले जातात. राजकारणात येण्यापूर्वी ते डॉईच बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक होते. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये आल्यावर कमलनाथ सरकार जाऊन शिवराजसिंह सरकार पुन्हा येण्याचे वर्तुळ पूर्ण झाल्यावर इस्लाम यांचा भाग्योदय अपेक्षित होता तो आता होत आहे. 

अमरसिंग यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता असल्याने त्यांचा विजय फारसा अवघड नाही.  मागच्या सात वर्षांपासून भाजपमध्ये असलेले इस्लाम हे कार्पोरेट क्षेत्राशी लागेबांधे असलेले नेते आहेत. सध्या ते पक्षप्रवक्ते म्हणून शाहनवाज हुसेन यांच्याबरोबरीने कार्यरत आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता घालविण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह केलेला पक्षत्याग महत्वाचा ठरला होता. त्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी याच जफर इस्लाम यांनी अतिशय कळीची भूमिका बजावली होती. मूळचे झारखंडचे असलेले इस्लाम सध्या मुंबईत स्थायिक आहेत. 

Edited  by : Mangesh Mahale      


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com