काँग्रेस सोडल्यानंतर 24 तासांतच नेत्याने मागितली सोनिया गांधींची जाहीर माफी

काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
sushmita dev asks forgiveness from congress president sonia gandhi
sushmita dev asks forgiveness from congress president sonia gandhi

नवी दिल्ली : महिला काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सुश्मिता देव (Sushmita Dev) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सुश्मिता देव यांनी त्यांचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) पाठवला होता. त्यांनी काल पक्ष सोडल्यानंतर आज सोनिया गांधींची माफी मागितली आहे. 

आसाम विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला देव यांच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देव यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. सुश्मिता देव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची आई बीथिका देव या आसाम येथील सिल्चर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

तृणमूल प्रवेशानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुश्मिता देव यांनी पक्ष सोडण्याचे नेमके कारण सांगण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा माझा पक्ष सोडण्याशी कोणताही संबंध नाही. माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. परंतु, मला माझ्या लोकांना उत्तर द्यावे लागत आहे. मी राजीनामापत्रात सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. माझे काँग्रेससोबत दीर्घकाळ संबंध होते. काँग्रेसने मला अनेक संधी दिल्या आहेत. मी 30 वर्षांच्या राजकारणात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून काहीच मागितले नाही. मला काँग्रेसच्या अध्यक्षा माफ करतील अशी आशा आहे.  

देव यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. देव यांनी पक्ष सोडण्याबद्दल सिब्बल यांनी नेतृत्वाला जबाबदार धरले होते. सिब्बल यांनी म्हटले होते की, सुश्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे तरुण नेते बाहेर पडत असताना आमच्यासारख्या वृद्धांकडून पक्ष बळकटीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दोष दिला जात आहे. पक्ष अजूनही डोळे बंद ठेवूनच पुढे जात आहे.  

कपिल सिब्बल यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. त्यावेळी सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले होते. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात होते. सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. यातील सर्व नेते या मेजवानीला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com