धक्कादायक : 'एम्स'च्या डॉक्टरांवर सुशांतचे कुटुंबीय अन् वकिलांकडून दबाव

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन सुरू असलेला गदारोळ कायम आहे. सीबीआयने अद्याप त्याचा मृत्यू कशाने झाला हे उघड केलेले नाही.
sushant singh rajputs family pressuring aiims doctors says satish maneshinde
sushant singh rajputs family pressuring aiims doctors says satish maneshinde

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपास सुरूच असल्याचे जाहीर केले आहे. सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने 'एम्स'च्या अहवालाच्या आधारे काढल्याची चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणी सीबीआयच्या संचालकांना सुशांतची बहीण भेटणार आहे. रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी याला आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पथकाने सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आणि या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले  होते की, सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त कोणतीही इतर जखम नव्हती. याचबरोबर त्याचा कोणाशी संघर्ष अथवा झटापट झाल्याच्याही शरीरावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरही अशा प्रकारच्या खुणा सापडलेल्या नाहीत. 

यावर सीबीआयने खुलासा केला आहे. सीबीआयने म्हटले आहे  की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

सुशांतने आत्महत्या केली होती, अशा निष्कर्षापर्यंत सीबीआय पोचल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुशांतची बहीण सीबीआयच्या संचालकांना भेटणार आहे. याला रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सीबीआय ही निष्पक्षपातीपणे तपास करीत आहे. सीबीआय ही कोणत्याही हस्तक्षेपांपासून मुक्त असायला हवी. सुशांतचे कुटुंबीय आणि त्यांचे वकील हे 'एम्स'च्या डॉक्टरांशी तपासाच्या काळात बोलून त्यांच्यावर दबाव आणत आहेत. पुराव्यांशी छेडछाड करण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारचे प्रयत्न सुशांतच्या कुटुंबीयांकडून झाल्यास ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जातील. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com