तपासाला एवढा वेळ का लागतोय...सुशांतचे कुटुंबीय सीबीआयवर वैतागले

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप कायम आहे. त्याची आत्महत्या की हत्या हे गूढ अद्याप उकलले नाही. आता सुशांतचे कुटुंबीय सीबीआयवर वैतागले आहेत.
sushant singh rajput family frustrated by cbi investigation in case
sushant singh rajput family frustrated by cbi investigation in case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागासोबत (सीबीआय)  सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करीत आहे. यात सीबीआयला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) न्यायवैद्यक तज्ज्ञही मदत करीत आहेत. सुशांतचे कुटुंबीय आणि त्यांचे वकील विकाससिंह यांनी या प्रकरणी आता सीबीआयला लक्ष्य केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे पथक दिल्लीला परतले आहे. याचबरोबर या प्रकरणी सीबीआयला तपासात मदत करण्यासाठी मुंबईला गेलेले एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथकही दिल्लीत परतले आहे. एम्सच्या पथकाने हा अहवाल तयार केला असून, हे पथक लवकरच आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द करेल. सीबीआयने सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली होती.  

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण आता हत्या म्हणून सीबीआय का नोंद करीत नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, सीबीआय या प्रकरणी विलंब लावत असून, तो त्रासदायक ठरत आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आता हत्येत रुपांतरित करण्यास सीबीआयला एवढा का वेळ लागत आहे? सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे मी एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांनी पाठिवली होती. त्या डॉक्टरांनी सुशांतची 200 टक्के हत्या झाली असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या गळ्यावरील खुणांच्या आधारे त्याने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाल्याचे त्या डॉक्टरांनी सांगितले होते. 

सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्ती हिनेही सीबीआय तपासाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही खूप काळापासून संयम बाळगला आहे. सत्य शोधण्यासाठी आणखी किती वेळ तुम्हाला लागेल? 

एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले म्हणाले की, सुशांतच्या गळ्यावर खुणा होत्या. मात्र, त्यांच्या आधारे सुशांतची आत्महत्या अथवा हत्या हे सांगणे शक्य नाही. या खुणा आत्महत्या अथवा हत्येमुळे पडल्या असाव्यात हे सुद्धा सांगता येणार नाही. या प्रकरणी हत्या झाली हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला आणखी पुरावे लागतील. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com