बिहारच्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत सुशांतचा भाऊ तर आठ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी - sushant singh rajput cousin neeraj singh bablu is richest minister in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत सुशांतचा भाऊ तर आठ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सत्ताधारी भाजप आणि जेडीयूच्या सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. यातील आठ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. 

पाटणा : बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यातील आठ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सर्वांत श्रीमंत मंत्री हे भाजपचे नीरजकुमारसिंह बबलू आहेत. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे ते चुलतभाऊ आहेत.  

राज्यपाल फागू चौहान यांनी आज 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी, जनक राम यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत. 

हेही वाचा : शहनवाज हुसेन यांचा उलटा प्रवास!

नीरजसिंह यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकले असून, तीन वेळा ते जेडीयूच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ते बिहारच्या मंत्रिमंडळातील सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले आहेत. त्यांची संपत्ती 14 कोटी रुपयांहून अधिक आहे. 

आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये 8 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नीरजसिंह यांच्यावरही तीन गुन्हे दाखल आहेत. तिन्ही गुन्ह्यांत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. ते छातापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. 

हेही वाचा : बिहारमध्ये अखेर भाजप नव्हे तर नितीशकुमारच मोठा भाऊ...!

बिहारच्या एकूण मंत्रिमंडळात आता भाजपचे 16 मंत्री असून, त्यांच्याकडे 22 खात्यांचा पदभार आहे. याचवेळी जेडीयूचे 13 मंत्री असून, त्यांच्याकडे 21 खाती आहेत. याचवेळी माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळाले आहे. 

हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराचं घोड गंगेत न्हालं...

नव्या मंत्र्यांमधील प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री अधिक आहेत. भाजपने अधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, जेडीयूने मात्र, मागील वेळी मंत्रिमंडळात असलेल्यांना प्राधान्य दिले आहे.  नितीश सरकारचा शपथविधी मागील 16 नोव्हेंबरला झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यासोबत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, नंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख