सुशांत अन् क्रिती सॅनॉन बुडाले होते प्रेमात..! - sushant singh rajput and kriti sanon was in relationship said actress lizza malik | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत अन् क्रिती सॅनॉन बुडाले होते प्रेमात..!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. या प्रकरणी रोज नवनवीन बाबी समोर येत असून, यातील गुंतागुंत वाढत आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह सुमारे डझनभर जणांना अटक केली आहे. या प्रकरणी रोज समोर येणाऱ्या नवनवीन  माहितीमुळे यातील गुंतागुंत आणखी वाढत आहे. अभिनेत्री लिझा मलिक हिने आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले होते.  

अभिनेत्री लिझा मलिकने म्हटले आहे की, सुशांत आणि क्रिती सॅनॉन यांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा आधी अनेक वेळा इन्कार केला होता. मात्र, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते आणि एकमेकांसमवेत अतिशय आनंदी होते. क्रितीच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या ते एकमेकांच्या सहवासात अतिशय आनंदी असल्याचे मी पाहिले होते. 

या वाढदिवसाच्या पार्टीत क्रिती ही पाहुण्यांचे स्वागत करण्यात गुंतली होती. त्यावेळी सुशांत पार्टीत आलेल्यांना ड्रिंक देत होता. तुम्ही कोणाला सांगितले नाही तरी दोन व्यक्तींमधील संबंध लगेच लक्षात येतात. त्यामुळे त्या दोघांना त्यावेळी कितीही नाकारले असले तरी ते प्रेमात होते, असे लिझा हिने नमूद केले आहे. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख