यूपीएससी परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Supreme Court refuses to postpone civil service exam of 2020 | Politics Marathi News - Sarkarnama

यूपीएससी परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि देशभरात अनेक ठिकाणी आलेला पूर या पार्श्वभूमीवर यूपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यावर्षी 4 ऑक्टोबरला सनदी सेवेची पूर्व परीक्षा होईल, असे जाहीर केले होते. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अनेक ठिकाणी आलेला पूर यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. याचबरोबर परीक्षा देण्याची शेवटची संधी होती त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत विचार करण्यास न्यायालयाने सरकारला सुचवले आहे.   

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती यामुळे यूपीएससी परीक्षा 2020 आणि 2021 तीन महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. याला यूपीएससीने विरोध केला होता. परीक्षा घेण्यासाठी पुरेशा उपाययोजना आणि आवश्यक ती काळजी घेण्यात येत असल्याचे यूपीएससीने न्यायालयाला सांगितले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए.एम.खानविलकर, बी.आर.गवई आणि कृष्णा मुरली यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यूपीएससी परीक्षा 2020 आणि 2021 यांना मुदतवाढ देण्यास खंडपीठाने नकार दिला. कोरोनामुळे या परीक्षा देण्याची शेवटची संधी ज्यांच्यासाठी होती त्यांना आणखी एक संधी देण्याचा विचार करावा, अशी सूचना खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे.  

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) यावर्षी 4 ऑक्टोबरला सनदी सेवेच्या पूर्व परीक्षा होतील. या परीक्षेसाठी उमेदवारांना सोईचे केंद्र निवडण्याची मुभा आता यूपीएसससीने दिली आहे. याबद्दल उमेदवारांकडून मागणी होत असल्याने यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. सनदी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी मोठ्या प्रमाणात उमेदवार बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचवेळी भारतीय वन सेवेचीही पूर्व परीक्षा होणार आहे. 

अनेक उमेदवारांनी यूपीएससीकडे त्यांना मिळालेली परीक्षा केंद्रे बदलून मिळावीत, अशी मागणी केली होती. आता यूपीएससीने उमेदवारांना त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करण्यास सांगितले आहे. परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय सनदी सेवा (मुख्य) परीक्षा 2020 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2020 साठीही हा निर्णय लागू असेल. 

उमेदवारांना पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करण्याची विंडो 7 ते 13 जुलै (सायंकाळी 6 पर्यंत) आणि 20 ते 24 जुलै 2020 (सायंकाळी 6 पर्यंत) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन वरील परीक्षेसाठी त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करावीत. संबंधित परीक्षा केंद्रांवरील उपलब्ध आसन क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे संकेतस्थळ मिळेल, असे यूपीएससीने म्हटले आहे. 

पसंतीचे केंद्र मिळण्याचा मुख्य निकष हा प्रथम पसंती सादर करणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असेल. संबंधित परीक्षा केंद्रांची क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी पसंती नोंदवता येणारनाही . पसंतीचे परीक्षा केंद्र न मिळालेल्या उमेदवारांना उरलेल्या केंद्रांमधून निवड करावी लागेल, असे यूपीएससने नमूद केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख