काँग्रेसला 'सर्वोच्च' दिलासा; आवडत नसेल तर दुर्लक्ष करण्याचा याचिकाकर्त्याला सल्ला - Supreme Court refuses to entertain plea against alleged Covid toolkit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

काँग्रेसला 'सर्वोच्च' दिलासा; आवडत नसेल तर दुर्लक्ष करण्याचा याचिकाकर्त्याला सल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

भाजपने काही कागदपत्रांच्या आधारे काँग्रेसवर कथिट टूलकिटचा आरोप केला होता.

नवी दिल्ली : देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कोविड टूलकिट तयार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या टूलकिटची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (NIA) चौकशी करण्याची मागणी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत काँग्रेसला दिलासा दिला आहे. (Supreme Court refuses to entertain plea against alleged Covid toolkit)

भाजपने (BJP) काही कागदपत्रांच्या आधारे काँग्रेसवर कथिट टूलकिटचा आरोप केला होता. टूलकिटच्या आधारे काँग्रेसकडून देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं होतं. याबाबतची काही कागदपत्रे भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात आली होती. पण काँग्रेसकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते. 

हेही वाचा : मोठी बातमी : राज्यातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार...पण हे बारा निकष वाचा

त्यानंतर अॅड. शशांक शेखऱ झा यांनी ही याचिका केली होती. यामध्ये कथित टूलकिट हे षडयंत्र असल्याचे नमूद करण्यात आलं होतं. या आरोपांमध्ये तथ्य असल्यास काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. देशातील सर्व राजकीय पक्ष, संघटना तसेच नागरिकांना कोणतेही राष्ट्रविरोधी भूमिका घेण्यापासून रोखणारी नियमावली तयार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती. 

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांना यावरून सल्ला दिला. ते म्हणाले, 'तुम्हाला टूलकिट आवडत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. हा राजकीय प्रपोगंडाचा भाग आहे. तुम्हाला हे आवडत नसेल तर दुर्लक्ष करा. भारतात लोकशाही आहे, हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळं कलम 32 अंतर्गत आम्ही आदेश का देऊ? आम्ही या याचिकेची दखल घेऊ शकत नाही.' न्यायालयाच्या या भूमिकेनंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.

टूलकिटचे आरोप फेटाळून लावताना काँग्रेसने भाजपवरच पलटवार केला होता. काँग्रेसला बदनाम कऱण्यासाठी भाजपकडून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच या प्रकरणात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख