लखीमपूर खीरीवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला दणका
Yogi Adityanath Sarkarnama

लखीमपूर खीरीवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला दणका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासावर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (CJI N.V.Ramana) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला दणका दिला आहे.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची निवड केली आहे. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेतील. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. यात एस.बी.शिरोडकर, दिपेंदरसिंह आणि पद्मजा चौहान या तिघांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आणि निवृत्त न्यायाधीशांकडून अहवाल मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 8 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी तपासावर नाराजी व्यक्त करीत राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे तपास करण्याची आवश्यकता न्यायालयाने बोलून दाखवली होती. यासाठी दुसऱ्या राज्यातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवावी, अशीही सूचना न्यायालयाने केली होती. राज्य सरकारने नेमलेल्या न्यायिक आयोगाच्या सदस्याने तपासावर देखरेख ठेवण्यावर कोणताही विश्वास नसल्याचेही न्यायालयाने बोलून दाखवले होते.

Yogi Adityanath
टीव्हीवरील चर्चांमुळे होतंय सर्वाधिक प्रदूषण! सरन्यायाधीशांनी सुनावलं

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Yogi Adityanath
भाजपचं जशास तसं उत्तर! विरोधकांचे 4 आमदार फोडून दिला मोठा धक्का

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in