सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेचा मोबाईलही हॅक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पिगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
Supreme Court employee who had accused Chief Justice of sexual harassment in the Pegasus list
Supreme Court employee who had accused Chief Justice of sexual harassment in the Pegasus list

नवी दिल्ली :  राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे (Pegasus Spyware) हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत सर्वोच्च न्यायालयातील एक महिला कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांचे मोबाईल क्रमांकही आढळून आले आहेत. या महिलेने निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्यावर एप्रिल 2019 मध्ये लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतरच महिलेसह कुटूंबातील सदस्यांचे मोबाईल क्रमांक यादीत आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Supreme Court employee who had accused Chief Justice of sexual harassment in the Pegasus list)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पिगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. ही कंपनी केवळ सरकारलाच हे स्पायवेअर विकत देते. त्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. या प्रकरणात रंजन गोगोई यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचाही फोन हॅक झाल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

द वायर या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लिक झालेल्या माहितीमध्ये या महिलेने सरन्यायाधीशांवर आरोप केलेल्या आठवड्यामध्येच तिचा पती व दोन भावांचे आठ मोबाईल नंबर या यादीत आढळले आहेत. या महिलेसह एकूण अकरा मोबाईल क्रमांक निवडण्यात आले होते. सरन्यायाधीशांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने ही महिला प्रकाशझोतात आली होती. त्यानंतरच या महिलेचे फोन पिगॅससच्या यादीत आढळून आले. दरम्यान, हे अकरा मोबाईल क्रमांक पिगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक झाले होते किंवा नाही, याबाबत साशंकता असल्याचे द वायरने म्हटले आहे. संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी यामध्ये सहकार्य करण्यास नकार दिल्याचे द वायरने स्पष्ट केलं आहे. 

काय आहे प्रकरण?

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रल्हाद पटेल यांच्यासह राहुल गांधी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी 2018-19 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

पिगॅससवरून संसद व संसदेबाहेरही जोरदार वाद निर्माण झाला आहे. यावर वैष्णव यांनी संसदेत खुलासा केला. त्यांनी खुलासा केल्यानंतर काही वेळातच खुद्द त्यांचेच नाव या अहवालात असल्याचे समोर आलं. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. वैष्णव यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते 2018-19 मध्येच खासदार झाले आहेत. 

प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये भाजपच्या प्रचाराची रणनीती आखली होती. यावर्षी भाजपने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर किशोर यांनी भाजप वगळून अनेक राजकीय पक्षांसाठी कामं केलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com