मित्राच्या जाण्याने भावुक झालेले रजनीकांत म्हणाले, त्याच्यासोबतचे क्षण मी विसरु शकणार नाही!

तमिळ चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विवेक यांचे हृदय विकाराने आज पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
superstar rajanikanth offers condolences to actor and comedian vivek
superstar rajanikanth offers condolences to actor and comedian vivek

चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विवेक (वय 59) यांचे आज पहाटे हृदय विकाराने निधन झाले. त्यांना काल (ता.16 ) हृदय विकाराचा झटका आल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. विवेक यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. भावुक झालेल्या सुपरस्टार रजनीकांत यांनीही मित्रासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

अतिशय लोकप्रिय असलेल्या विवेक यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विवेक यांनी रजनीकांत यांच्यातील मैत्री व्यावसायिक संबंधांच्या पलिकडची होती. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिच्या विवाहसोहळ्यालाही विवेक आवर्जून हजर होते. याचबरोबर चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठा सन्मान असणारा दादासाहेब  फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्यानंतर त्यांना अतिशय अनोख्या स्टाईलने विवेक यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या होत्या. रजनीकांत यांच्यासमवेत शिवाजी : द बॉस (2007), उळाईप्पली (1993) आणि मनाथील उरुधी वेंडम (1987) या चित्रपटांत विवेक यांनी काम केले होते. विकी डोनर या हिंदी चित्रपटाचा तमिळ रिमेक धारला प्रभू हा विवेक यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. 

रजनीकांत ट्विटरवर विवेक यांना श्रद्घांजली वाहिली आहे. रजनीकांत यांनी विवेक यांचा उल्लेख ज्युनिअर कलैवनार असा केला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी चित्रपट अभिनेते एन.एस.कृष्णन यांचा उल्लेख कलैवनार असा केला जात असे. त्यांची ओळख तमिळमधील चार्ली चॅप्लिन अशीही होती. त्यांच्याशी रजनीकांत यांनी विवेक यांची तुलना केली आहे. 

रजनीकांत यांनी म्हटले आहे की, ज्युनिअर कलैवनार, सामाजिक कार्यकर्ते आणि माझे घनिष्ठ मित्र विवेक. त्यांच्या जाण्याने मला अतीव दु:ख झाले आहे. मी शिवाजी चित्रपटावेळी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. 

विवेक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विवेक यांच्या अकाली निधनाने अनेक जणांना धक्का बसला आहे. त्यांच्या विनोदी अभिनयामुळे लोकांचे मनोरंजन झाले. त्यांचे चित्रपट आणि आयुष्य या दोन्ही गोष्टींतून त्यांची समाजाप्रतीची कटिबद्धता दिसून येते. त्यांचे कुटंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com